महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाइन-
साहित्य, कला आणि संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या संगमनेरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ‘कवी अनंत फंदी’ बंदिस्त नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्याने रसिकांना आनंद दिला असला, तरी या कार्यक्रमाच्या पडद्यामागे रंगलेल्या राजकीय खेळीने शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या सोहळ्याचे सूत्रसंचालन भारतीय जनता पक्षाशी संबंधित असलेल्या स्मिता गुणे यांनी केल्यावरून राजकीय वेगवेगळ्या चर्चा सुरू असून, या संपूर्ण प्रकारावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुका प्रमुख अमर कतारी यांनी थेट आणि परखड शब्दांत टीकास्त्र सोडले आहे.
नाट्यगृहाच्या रूपाने संगमनेरच्या सांस्कृतिक वैभवात भर पडल्याचे चित्र असले, तरी कार्यक्रमातील राजकीय गणितांवरून अमर कतारी यांनी संभ्रम व्यक्त केला आहे. संगमनेरला सुसंस्कृतीचे शहर म्हणायचे की राजकारणाचे गणित बिघडवणारे शहर म्हणायचे, असा सवाल उपस्थित करत त्यांनी सध्या सुरू असलेल्या घडामोडींवर बोट ठेवले आहे. कलाकारांसाठी आणि रसिकांसाठी अद्यावत बंदिस्त नाट्यगृह उभे राहिल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच, कार्यक्रमाच्या नियोजनातील विसंगतीकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजक संगमनेर नगरपालिका, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, सेवा समितीचे नगरसेवक आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे असल्याचे सांगितले जाते. निमंत्रण पत्रिका वाटप आणि सोशल मीडियावरच्या प्रचारात नगरपालिकेसोबत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सहभाग दिसून आला, तर उद्घाटक म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. त्यांच्याविषयी कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट करत अमर कतारी यांनी मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षांना डावलल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले. ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांचा पक्ष किंवा समविचारी आघाडीतील कोणालाही निमंत्रण देण्यात आले नाही; न बोलावण्याचा निर्णय हा आयोजकांचा वैयक्तिक विषय मानता येईल, असेही त्यांनी नमूद केले.
मात्र, खरी खटकणारी बाब कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची ठरल्याचे अमर कतारी यांनी ठणकावून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता गुणे आणि निलेश पर्बत यांनी केले. यामध्ये भाजपशी संबंधित, कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेल्या पार्श्वभूमीच्या स्मिता गुणे यांना सूत्रसंचालनाची जबाबदारी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. महायुतीमध्ये जागा वाटपात नगराध्यक्षपद भाजपकडे गेले असते तर त्या संभाव्य उमेदवार ठरल्या असत्या, तसेच त्या नगराध्यक्ष मैथिलीताई तांबे आणि काँग्रेसच्या विरोधकांच्या भूमिकेत राहिल्याचे बोलले जाते. अशा परिस्थितीत ज्यांच्या विरोधात राजकीय भूमिका घेतली जाते, त्यांच्याच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्याच व्यक्तीकडे सोपवले जाणे, हे संगमनेरच्या राजकारणातील ‘अजब’ समीकरण असल्याची टीका कतारी यांनी केली आहे.
एकंदरीतच, आयोजक आणि आमदार सेवा समितीशी संबंधित, निमंत्रक व उद्घाटक काँग्रेसशी जोडलेले आणि सूत्रसंचालन मात्र भाजपशी संबंधित व्यक्तीकडे, असा हा सगळा मेळ कसा बसतो, असा खोचक सवाल अमर कतारी यांनी उपस्थित केला आहे. संगमनेरमध्ये नेमके काय सुरू आहे आणि राजकारण कोणत्या दिशेने चालले आहे, हे पाहता सामान्य कार्यकर्त्याचे ‘डोकं बधीर व्हायची वेळ आली’ असल्याची रोखठोक भावना त्यांनी व्यक्त केली आहे. गटारी यांच्या सोशल मीडियातील या व्हायरल व्हिडिओची शहरात चर्चा रंगली असून या विचित्र राजकीय समीकरणावरून संगमनेरच्या राजकीय वर्तुळात पुढील काही दिवस रंगतदार चर्चा झडण्याची चिन्हे आहेत.






