महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा कलश आणणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात कृषी आणि औद्योगिक क्रांती घडवून विकासाचा भक्कम पाया घातला. प्रगतशील महाराष्ट्र आणि देशाच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान आहे, असे गौरवोद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी काढले.
अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या प्रांगणातील ‘यशवंततीर्थ’ येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त तथा सेक्रेटरी शरयूताई देशमुख, प्राचार्य प्रा. व्ही. बी. धुमाळ, डॉ. प्रसाद बाविस्कर, डॉ. मच्छिंद्र चव्हाण, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. संदीप निंबाळकर, डॉ. राहुल सातपुते, विलास भाटे, जे. बी. सेठी, अंजली कन्नावार, डॉ. विलास शिंदे, आशिष कुमार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेच्या सुरक्षा विभागाच्या वतीने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना मानवंदना देण्यात आली.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी यशवंतरावांच्या कार्याचा आणि त्यांच्यासोबतच्या सहवासाच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांनी ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करतानाच सहकार, साहित्य, समाजकारण, शिक्षण आणि कृषी अशा सर्वच क्षेत्रांत दिशादर्शक काम केले. देशाचे उपपंतप्रधानपद आणि इतर महत्त्वाची पदे भूषवूनही त्यांनी अत्यंत साधे जीवन जगले. संगमनेर तालुक्यातील विविध सहकारी संस्थांच्या वाटचालीतही त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
यशवंतराव हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आदर्श मापदंड असल्याचे सांगून थोरात म्हणाले की, स्वर्गीय सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव संगमनेरला तसेच जोर्वे येथील निवासस्थानी आले होते. वेणूताईंच्या निधनानंतर ते साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला आले असताना, डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी औरंगाबाद-शिर्डी-श्रीरामपूर या संपूर्ण प्रवासाची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. तसेच, मुंबईतील नरिमन पॉईंट येथील त्यांच्या अत्यंत साध्या आणि लहान घरात त्यांचे अंत्यदर्शन घेतल्याची आठवण आजही स्मरणात आहे. त्यांचे कार्य सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शरयूताई देशमुख म्हणाल्या की, यशवंततीर्थावर दरवर्षी नामवंत व्याख्याते, साहित्यिक आणि कवींच्या उपस्थितीत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले जाते. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी यशवंतरावांचा हाच समृद्ध वारसा जोपासत कृषी, शिक्षण, सहकार आणि ग्रामीण विकासात मोठे योगदान दिले आहे.
यशवंततीर्थासह अमृत उद्योग समूहातील स्मारके नव्या पिढीसाठी प्रेरणादायी-
अमृत उद्योग समूहाच्या वतीने नवीन पिढीला महान नेत्यांच्या विचारांची प्रेरणा मिळावी यासाठी विविध स्मारके उभारण्यात आली आहेत. यामध्ये सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर श्रीमती इंदिरा गांधी यांचे ‘शक्तिस्थळ’, तर अमृतवाहिनीच्या प्रांगणात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे ‘यशवंततीर्थ’ आणि स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे ‘वसंततीर्थ’ साकारण्यात आले आहे. या व्यक्तिमत्त्वांच्या जीवनकार्यातून नव्या पिढीला सातत्याने प्रेरणा मिळत आहे.






