मानवाच्या इतिहासात काही महापुरुष असे होऊन गेले, ज्यांनी केवळ धर्माची शिकवण दिली नाही, तर माणसाला माणूस म्हणून जगण्याचा मार्ग दाखविला. त्यांनी समाजाला कर्मकांडाच्या अंधारातून बाहेर काढून सत्य, प्रेम, समता आणि बंधुभावाचा प्रकाश दिला. शीख धर्माचे संस्थापक आणि महान संत गुरुनानक देव हे अशाच युगप्रवर्तक महापुरुषांपैकी एक होत. त्यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच गुरुपर्वाच्या पवित्र पर्वावर त्यांच्या विचारांचे स्मरण करणे म्हणजे केवळ एका धर्मगुरूला अभिवादन करणे नव्हे, तर माणुसकीच्या मूल्यांशी पुन्हा एकदा नाते जोडणे होय. आज जगात धर्म, जात, भाषा, वंश आणि राजकीय विचारांच्या नावावर माणसांमध्ये दुरावा निर्माण होत असताना गुरुनानकांचे विचार अधिकच प्रासंगिक ठरतात. गुरुनानक देव यांचा जन्म १५ एप्रिल १४६९ रोजी पंजाबमधील तलवंडी येथे झाला. हे ठिकाण आज पाकिस्तानमध्ये असून ननकाना साहिब म्हणून प्रसिद्ध आहे. लहानपणापासूनच त्यांच्यात चिंतनशील वृत्ती, करुणा आणि अन्यायाविरुद्ध प्रश्न विचारण्याचे धाडस होते. समाजात धर्माच्या नावाखाली चालणारे भेदभाव, कर्मकांड, जातिभेद आणि सामाजिक विषमता पाहून त्यांचे मन अस्वस्थ होत असे. धर्म म्हणजे केवळ बाह्य आचार-विचार, पोशाख किंवा धार्मिक विधी नसून तो माणसाच्या आचरणातून प्रकट झाला पाहिजे, अशी त्यांची ठाम भूमिका होती. त्यांनी अध्यात्माला मानवतेची जोड दिली आणि धर्माला माणसाच्या कल्याणाचे साधन बनविले.
गुरुनानकांच्या तत्त्वज्ञानाचा पाया तीन मूलभूत शिकवणींवर आधारलेला आहे ‘नाम जपो, किरत करो आणि वंड छको.’ म्हणजेच ईश्वराचे स्मरण करा, प्रामाणिक कष्ट करून उपजीविका कमवा आणि आपल्या कमाईतील काही भाग गरजूंशी वाटून घ्या. या तीन शिकवणींमध्ये संपूर्ण जीवनाचे तत्त्वज्ञान सामावलेले आहे. ईश्वराचे स्मरण म्हणजे केवळ प्रार्थना नव्हे, तर आपल्या आचरणात सत्य, प्रेम आणि सद्भावना जपणे होय. प्रामाणिक श्रम म्हणजे कोणाचे शोषण न करता स्वाभिमानाने जगणे. तर वंड छको म्हणजे समाजातील वंचित, गरजू आणि दुर्बल घटकांबरोबर आपल्या सुख-दुःखाची वाटणी करणे. आजच्या स्वार्थप्रधान आणि स्पर्धेच्या जगात या शिकवणींचे महत्त्व अधिकच वाढले आहे. गुरुनानकांनी मांडलेली ‘एक ओंकार’ ही संकल्पना विश्वातील एकत्वाचा संदेश देते. परमेश्वर एक आहे आणि सर्व मानव त्याचीच निर्मिती आहेत, तर मग माणसामाणसांत उच्च-नीचतेची भिंत कशासाठी? जात कोणती, धर्म कोणता, भाषा कोणती किंवा जन्म कुठे झाला, यावर माणसाचे श्रेष्ठत्व ठरत नाही. माणसाची ओळख त्याच्या विचारांनी, कृतीने आणि माणुसकीने ठरते. ही भूमिका त्या काळातील सामाजिक विषमतेला दिलेले निर्भीड आव्हान होते. गुरुनानकांनी स्त्री-पुरुष समानतेचाही पुरस्कार केला. स्त्रीला कमी लेखणाऱ्या मानसिकतेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. स्त्रीशिवाय मानवजातीच्या अस्तित्वाची कल्पनाही अशक्य असताना तिचा अपमान आणि अवहेलना कशी काय योग्य ठरू शकते, हा त्यांचा विचार आजही समाजाला अंतर्मुख करणारा आहे.
गुरुनानकांच्या विचारांचे सर्वाधिक सुंदर आणि जिवंत प्रतीक म्हणजे ‘लंगर’ ही परंपरा. गुरुद्वारामध्ये जात, धर्म, पंथ, श्रीमंती किंवा गरिबी असा कोणताही भेद न करता सर्वजण एकाच पंक्तीत बसून भोजन करतात. ही केवळ अन्नदानाची व्यवस्था नाही, तर सामाजिक समतेची प्रत्यक्ष कृती आहे. ज्या समाजात काहींना स्पर्श करण्यासही मनाई होती, त्या समाजात सर्वांनी एकत्र बसून भोजन करावे, ही क्रांतिकारी सामाजिक भूमिका होती. समता ही केवळ भाषणात किंवा पुस्तकात नसावी, तर ती प्रत्यक्ष व्यवहारात उतरली पाहिजे, हा संदेश लंगर देतो. भुकेल्या माणसाला धर्म विचारण्याऐवजी त्याला अन्न देणे, हाच खऱ्या धर्माचा अर्थ आहे. आज समाजात वाढणारी आर्थिक विषमता आणि सामाजिक दरी लक्षात घेता लंगरची परंपरा मानवतेचा सर्वोत्तम आदर्श ठरते. गुरुनानकांनी धार्मिक कट्टरतेला आणि अंधानुकरणाला विरोध केला. त्यांनी माणसाला विवेकाने विचार करण्याची शिकवण दिली. धर्माच्या नावाखाली जर माणसामाणसांत द्वेष निर्माण होत असेल, अन्यायाचे समर्थन होत असेल किंवा दुर्बलांचे शोषण केले जात असेल, तर अशा प्रवृत्तींचा पुनर्विचार झाला पाहिजे. धार्मिकता ही माणसाला जोडणारी असावी, तोडणारी नव्हे. पूजा, प्रार्थना आणि धार्मिक विधी यांपेक्षा सत्यनिष्ठ आचरण, प्रामाणिक श्रम, दया आणि परोपकार यांना अधिक महत्त्व आहे, असा त्यांचा संदेश होता. त्यांनी आपल्या उदासींच्या माध्यमातून विविध प्रदेशांत प्रवास करून लोकांशी संवाद साधला. विविध धर्मांच्या संतांशी विचारविनिमय केला आणि मानवतेचा समान धागा अधोरेखित केला.
आजच्या काळात गुरुनानकांचे विचार केवळ धार्मिक व्यासपीठांवर सांगून उपयोगाचे नाहीत, ते सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात उतरविण्याची खरी गरज आहे. धर्माच्या नावावर द्वेष पसरविणे, जातीय तेढ निर्माण करणे, स्त्रियांचा अपमान करणे, गरीब आणि वंचितांचे शोषण करणे, भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणे आणि माणसामाणसांत भिंती उभारणे या प्रवृत्ती गुरुनानकांच्या शिकवणीच्या पूर्णपणे विरोधात आहेत. सोशल मीडियावर धार्मिक अस्मितेच्या नावाखाली अपमानास्पद भाषा वापरणारे आणि समाजात वैमनस्य पसरविणारे लोक जर गुरुनानकांच्या नावाने उत्सव साजरा करत असतील, तर त्यांनी प्रथम त्यांच्या विचारांचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. गुरुपर्व साजरा करण्याचा खरा अर्थ मिरवणुका, सजावट आणि औपचारिक शुभेच्छांपुरता मर्यादित नाही; तर आपल्या वर्तनातून समता, सेवा आणि बंधुभाव प्रस्थापित करणे हा आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा, स्वातंत्र्याचा, न्यायाचा आणि बंधुतेचा अधिकार व मूल्याधार दिला आहे. गुरुनानकांनी शतकांपूर्वी मांडलेली मानवतेची शिकवण आणि संविधानाने स्वीकारलेली सामाजिक मूल्ये यांच्यात मानवी प्रतिष्ठेचा समान धागा दिसतो. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गुरुनानक यांसारख्या महापुरुषांच्या विचारांचा केंद्रबिंदू सामाजिक न्याय, समता आणि माणसाचे स्वातंत्र्य हाच आहे. समाजातील शेवटच्या घटकाला सन्मानाने जगण्याची संधी मिळाली पाहिजे, हीच खरी लोकशाही आणि खरी मानवता आहे.
गुरुनानक जयंती म्हणजे प्रकाशाचा, विवेकाचा आणि माणुसकीचा उत्सव. त्यांच्या विचारांचा स्वीकार केवळ एका समाजाने किंवा धर्माने करावा असे नाही, तर प्रत्येक भारतीयाने करावा. कारण मानवतेला धर्माची सीमा नसते आणि सेवेला जात-पंथाचा अडसर नसतो. भुकेल्याला अन्न, दुःखिताला आधार, अन्यायग्रस्ताला न्याय आणि प्रत्येक माणसाला सन्मान देणे हीच गुरुनानकांना खरी आदरांजली ठरेल. आज गरज गुरुनानकांच्या नावाचा जयघोष करण्यापेक्षा त्यांच्या विचारांचा जागर करण्याची आहे. धर्माच्या भिंती उंचावण्यापेक्षा माणुसकीचे पूल बांधण्याची आहे. कारण माणूस मोठा होतो तो त्याच्या धर्माच्या घोषणांनी नव्हे, तर त्याच्या कर्माने, करुणेने आणि इतरांच्या दुःखात सहभागी होण्याच्या वृत्तीने! गुरुनानकांचा मानवतेचा संदेश प्रत्येकाच्या मनात रुजला, तर समाजातील द्वेषाचे अंधार दूर होऊन समता, बंधुता आणि शांततेचा नवा प्रकाश निश्चितच निर्माण होईल. गुरुनानक देव यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!





