महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर गेल्या १२ ते १५ वर्षांपासून बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी आणि वारंवार बेकायदेशीर गर्भपात घडवून आणून जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब सदाराम खेवरे (रा. राहुरी, ता. राहुरी) यांच्यासह राहुरी येथील डॉ. संजय दादा म्हसे आणि डॉ. अनंत शेकुकर (दोघे रा. राहुरी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांना आरोपी करण्यात आले आहे.
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी रावसाहेब खेवरे याने सुरुवातीला तिच्याशी ओळख वाढवून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आपल्या मित्राच्या मदतीने तिला लग्नाचे आमिष दाखवत गेल्या १२ ते १५ वर्षांपासून पीडितेला विविध ठिकाणी ठेवून तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित करण्यात आले.
या अत्याचारातून पीडित महिला सात ते आठवेळा गर्भवती राहिली. मात्र, प्रत्येक वेळी राहुरी येथील डॉ. संजय म्हसे आणि डॉ. अनंत शेकुकर यांच्या मदतीने तिचा गर्भपात घडवून आणण्यात आला. सातत्याने झालेल्या गर्भपातांमुळे पीडितेच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारानंतर पीडित महिलेने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल खैरे करीत आहेत.






