महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
राज्याचे माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करत आपल्या गुणवत्तेने राज्य पातळीवर लौकिक मिळवलेल्या संगमनेर तालुका सहकारी दूध संघाच्या चेअरमनपदी रमेश लहानुभाऊ गुंजाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे.
संघाचे माजी चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत संचालक पदासाठी अर्ज भरल्यानंतर चेअरमनपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज नव्या चेअरमनच्या निवडीसाठी राजहंस दूध संघातील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सभागृहात संचालक मंडळाची विशेष बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकारी संस्था कार्यालयाचे उपनिबंधक संतोष कोरे होते. याप्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या विशेष सभेत चेअरमनपदाच्या निवडीची सूचना ज्येष्ठ संचालक संतोष मांडेकर यांनी मांडली, तर त्यास विक्रम थोरात यांनी अनुमोदन दिले. चेअरमनपदासाठी रमेश गुंजाळ यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक अधिकारी संतोष कोरे यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
या बैठकीस व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, ज्येष्ठ संचालक लक्ष्मणराव कुटे, विलासराव वर्पे, संतोष मांडेकर, विलास कवडे, बबनराव कुऱ्हाडे, बादशहा वाळुंज, संजय पोकळे, विक्रम थोरात, विष्णू ढोले, तुकाराम दातीर, रवींद्र रोहम, भारत मुंगसे, प्रमोद पावसे, प्रतिभाताई जोंधळे, श्रीमती मंदाताई नवले आणि कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. निवडीनंतर नवनिर्वाचित चेअरमन रमेश गुंजाळ यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
रमेश गुंजाळ यांना ज्येष्ठ कार्यकर्ते लहानुभाऊ पाटील गुंजाळ यांच्याकडून सामाजिक कार्याचा मोठा वारसा लाभला आहे. खांडगाव येथील प्रगतशील शेतकरी असलेले गुंजाळ यांनी गाव पातळीसह विविध सहकारी संस्थांमध्ये काम केले असून, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे दहा वर्षे संचालकपदही त्यांनी यशस्वीपणे भूषवले आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तरुणांच्या संघटनांसह खांडेश्वर देवस्थानच्या माध्यमातून देवस्थानच्या विकासातही त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. या निवडीनंतर खांडगाव व परिसरातील कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
नवनिर्वाचित चेअरमन रमेश गुंजाळ यांच्या निवडीबद्दल माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, विधान परिषदेचे सदस्य आमदार सत्यजित तांबे, एकविरा फाऊंडेशनच्या संस्थापक व युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात, जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह देशमुख, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, पांडुरंग पाटील घुले, ॲड. माधवराव कानवडे, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, शंकरराव खेमनर, आर. बी. राहाणे, शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव पा. खेमनर, इंद्रजीत भाऊ थोरात, रामहरी कातोरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लहानुभाऊ गुंजाळ, जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सांगळे, साखर संघाचे उपाध्यक्ष प्रतापराव ओहोळ, हौशीराम सोनवणे, अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे, अमोल शेलकर, राजेंद्र कडलग, नूर मोहम्मद शेख, अर्चना बालोडे, व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर व सर्व संचालक मंडळाने त्यांचे अभिनंदन केले आहे.
राजहंस दूध संघाचा लौकिक कायम ठेवत काम करणार – थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांनी १९७७ साली या दूध संघाची स्थापना केली असून, राज्याचे माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात व अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष तथा संघाचे संचालक रणजितसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संघाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. सर्व संचालक मंडळाला सोबत घेऊन सर्वसामान्य शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी आपण पूर्ण कार्यक्षमतेने काम करू. – रमेश गुंजाळ नवनियुक्त चेअरमन.






