महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –
प्रत्येक पात्र नागरिकाचा मताधिकार सुरक्षित ठेवणे ही लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या प्रत्येकाची जबाबदारी असून, मतदार याद्यांची बारकाईने तपासणी करून चुकीच्या पद्धतीने वगळलेल्या नावांचा शोध घ्या आणि संबंधित मतदारांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी मदत करा. काँग्रेसचे ‘वोट रक्षक’ प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून मताधिकाराच्या रक्षणासाठी काम करतील, असे काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या ‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियानात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
संगमनेर येथे अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटी उत्तर व दक्षिण आणि अहिल्यानगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बैठक व प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार हेमंत ओगले, जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक शरद आहेर, उत्तर जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, दक्षिण जिल्हाध्यक्ष किरण पाटील, शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह जिल्हा व तालुका काँग्रेसचे पदाधिकारी, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष आणि बीएलए-१ उपस्थित होते.
थोरात म्हणाले, प्रत्येक नागरिकाचा मताधिकार अबाधित ठेवण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या संघर्षाला व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे. मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा पाया आहे. तोच असुरक्षित झाला, तर लोकशाही आणि संविधानासमोर गंभीर प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे ही लढाई केवळ काँग्रेसपुरती मर्यादित नसून लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आहे.
भाजप निवडणूक आयोगाला हाताशी धरून निवडणूक प्रक्रियेचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप थोरात यांनी केला. देशभरातील कोट्यवधी मतदारांची नावे मतदार याद्यांतून वगळण्यात आल्याचा दावा करत, या प्रक्रियेतील त्रुटींविरोधात काँग्रेसने सातत्याने आवाज उठविल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या आक्षेपांनंतर काही सुधारणा झाल्या असल्या, तरी त्या पुरेशा नाहीत. प्रत्येक पात्र नागरिकाचा मताधिकार सुरक्षित होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवावा लागेल, असेही ते म्हणाले.
अहिल्यानगर जिल्ह्यात काँग्रेसच्या बूथस्तरीय प्रतिनिधींनी केलेल्या कामामुळे अनेक ठिकाणी मतदारांची नावे चुकीच्या पद्धतीने वगळली जाण्यापासून रोखता आली. मात्र, एवढ्यावर समाधान मानून चालणार नाही. प्रत्येक बूथवरील मतदार यादी तपासणे, वगळलेल्या नावांची प्रत्यक्ष पडताळणी करणे आणि पात्र मतदारांच्या नावांचा पुन्हा समावेश होण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘वोट रक्षक’ म्हणून जबाबदारी स्वीकारून घराघरांत संपर्क साधावा. मतदाराचे नाव यादीत आहे का, नाव वगळले असल्यास त्यामागील कारण काय आणि संबंधित नागरिक मतदानासाठी पात्र आहे का, याची खात्री करावी. कोणताही पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, या भावनेने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आमदार हेमंत ओगले म्हणाले, लोकशाहीसमोरील सध्याची आव्हाने लक्षात घेता कार्यकर्त्यांची सजगता महत्त्वाची आहे. राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत उपस्थित केलेले प्रश्न जनतेपर्यंत पोहोचत आहेत. कार्यकर्त्यांनी बूथस्तरावर सक्रिय राहून मतदार याद्यांची पडताळणी केली आणि त्रुटींबाबत वेळेत आक्षेप नोंदविले, तर गैरप्रकारांना आळा घालता येईल. प्रत्येक मतदाराशी संपर्क साधून त्याच्या नावाची खात्री करणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
मतदार पडताळणीसाठी काँग्रेसने ‘iamvoterakshak.in’ हे संकेतस्थळ सुरू केले असून, पक्षाचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी १३ नोव्हेंबर रोजी या उपक्रमाची माहिती जाहीर केली आहे. मतदार यादीतून नाव वगळले आहे का, हे तपासणे आणि नावाच्या पुनर्समावेशासाठी तक्रार नोंदविण्यास मदत करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. संकेतस्थळावर नाव अथवा मतदार ओळखपत्र क्रमांकाच्या आधारे तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय अभियानाच्या पुढील टप्प्यात प्रत्येक बूथवर किमान एक ‘वोट रक्षक’ नियुक्त करण्याचे काँग्रेसचे नियोजन आहे. पक्षाच्या सुधारित कार्यक्रमानुसार २२ ते ३० नोव्हेंबरदरम्यान वगळलेल्या नावांची बूथस्तरीय पडताळणी, २६ नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त ठाणे येथे राज्यस्तरीय ‘संविधान रक्षा मार्च’ आणि २९ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान गावपातळीवर ‘वोट बचाओ, देश बचाओ’ घोंगडी बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर संगमनेरमधील बैठक व प्रशिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
राहुल गांधी सातत्याने जनतेचे प्रश्न विविध व्यासपीठांवर मांडत असून, त्यांच्या भूमिकेवरील जनतेचा विश्वास वाढत असल्याचे थोरात यांनी सांगितले. आगामी काळ काँग्रेससाठी आशादायी आहे. कार्यकर्त्यांनी जनतेशी संपर्क वाढवून त्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी. अडचणीच्या आणि संघर्षाच्या काळात पक्षासोबत उभे राहणाऱ्या कार्यकर्त्यांना काँग्रेस कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.






