महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील एसटी प्रवाशांची ऊन, वारा आणि पावसापासून होणारी गैरसोय आता दूर होणार आहे. आमदार अमोल खताळ पाटील यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, तालुक्यातील लोहारे, निळवंडे, मांची फाटा, वडगाव पान, धांदरफळ बुद्रुक, धांदरफळ खुर्द आणि वरवंडी फाटा या सात महत्त्वाच्या ठिकाणी अद्ययावत प्रवासी निवारा थांबे उभारण्यास मंजुरी मिळाली आहे.
या निर्णयाअंतर्गत संगमनेर तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण ७५ प्रवासी मार्ग थांबे उभारण्यासाठी राज्य शासनाकडून १५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील सामान्य नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणावर एसटी बसने दैनंदिन प्रवास करतात. मात्र, अनेक बस थांब्यांवर निवाऱ्याची आणि बसण्याची पुरेशी सुविधा नसल्याने प्रवाशांना भरउन्हात किंवा पावसात उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत होती.
प्रवाशांची हीच गैरसोय आणि ग्रामीण भागातील गरज लक्षात घेऊन आमदार अमोल खताळ पाटील यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्राद्वारे निवेदन देऊन तालुक्यातील या प्रमुख सात ठिकाणी सुसज्ज निवारा थांबे उभारण्याची मागणी केली होती. मंत्र्यांनी या मागणीची तात्काळ दखल घेत निधीसह थांब्यांना हिरवा कंदील दाखवला आहे. या मंजुरीमुळे संबंधित सातही गावांतील प्रवासी आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून, स्थानिक नागरिकांनी आमदार खताळ यांचे आभार मानले आहेत.