महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वावर टीका करण्यापूर्वी संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देत विकासाचा हिशेब द्यावा, असे प्रत्युत्तर संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांनी आमदार अमोल खताळ यांना दिले आहे. संगमनेरचा स्वाभिमान गहाण ठेवून दिल्लीचा इतिहास-भूगोल उकरण्यापेक्षा तालुक्याच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप आणि शिंदे गटापर्यंतचा राजकीय प्रवास करणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या इतिहासावर भाष्य करण्यापूर्वी स्वतःच्या भूमिकांचा इतिहास तपासावा, अस शेलकर यांनी म्हटलं आहे. लोणीच्या मालकांची परंपरा पुढे नेत ‘आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे उचकून’ अशी भूमिका घेणे योग्य नसल्याचेही ते म्हणाले.
संगमनेरच्या हक्काची पुणे-नाशिक रेल्वे शिर्डीमार्गे वळवली जात असताना लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका का घेतली नाही, तसेच आरटीओ कार्यालयाच्या प्रश्नावर तालुक्याचे नुकसान होत असताना आवाज का उठवला जात नाही, असा सवाल शेलकर यांनी उपस्थित केला. पीकविम्याच्या लाभापासून शेतकरी वंचित राहत असून हक्काची ११ तास वीज मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. या प्रश्नांवर आमदारांनी किती प्रभावी पाठपुरावा केला, याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
तालुक्यातील गावोगावी राजकीय वरदहस्ताने कार्यरत असलेल्या कथित पंटर व बगलबच्च्यांचा हस्तक्षेप, वाळू तस्करी, अवैध दारू आणि ड्रग्ससंदर्भातील तक्रारींमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. धार्मिक कार्यक्रमांच्या व्यासपीठांचा वापर राजकीय भाषणांसाठी होत असल्याच्या तक्रारी असूनही या विषयांवर ठोस भूमिका न घेता राष्ट्रीय नेत्यांवर टीका करण्यात लोकप्रतिनिधींना अधिक रस असल्याचे शेलकर यांनी म्हटले आहे.
इतिहास आणि भूगोल शिकवण्याची गरज नसून सर्वांना सर्वांचा इतिहास व भूगोल चांगलाच ठाऊक आहे, असे सांगत संगमनेरचा स्वाभिमान खुंटीला टांगून कोण कोणाची हुजरेगिरी करत आहे, हे गेल्या दोन वर्षांत जनतेला समजल्याचे शेलकर यांनी स्पष्ट केले. पूर्वेकडून येणाऱ्या आदेशाशिवाय ज्यांचे पानही हलत नाही, त्यांनी इतरांच्या स्वाभिमानावर बोलण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे, असा पलटवार त्यांनी केला.
ईव्हीएम आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणातून मिळालेल्या आमदारकीचा वापर केवळ टीका-टिप्पणीसाठी न करता जनतेच्या हितासाठी करावा, असे आवाहन शेलकर यांनी केले. विधानसभेत केवळ वरिष्ठांच्या भूमिकेचे समर्थन करण्यापेक्षा गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडावेत तसेच तालुक्याचा विकासनिधी शून्यातून कोटींच्या घरात नेण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.
सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वावर टीका केल्याने संगमनेरचा विकास होणार नाही, हे लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी दिल्लीच्या राजकारणापेक्षा संगमनेरच्या जनतेच्या दरबारात उत्तर देण्याची तयारी ठेवावी, जनतेला आरोप-प्रत्यारोप नकोत, तर रेल्वे, आरटीओ, वीज, पीकविमा, रोजगार आणि विकासकामांचा ठोस हिशेब हवा असल्याने राष्ट्रीय राजकारणात रमण्यापेक्षा मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.