महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
राजकारणात पदे येतात आणि जातात; मात्र पद नसतानाही जनतेकडून मिळणारा सन्मान आणि विश्वास हीच खरी कमाई असते, असे प्रतिपादन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
अस्तगाव येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि ‘नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील व्यापारी संकुल’ लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अस्तगावसह पंचक्रोशीतील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून अस्तगाव व परिसरातील गावांमध्ये १० कोटी ४१ लाख रुपयांपेक्षा अधिक निधीच्या विकासकामांचे लोकार्पण यावेळी झाले. सुरुवातीला वर्गणीतून व्यापारी संकुल उभारण्याचा विचार होता, मात्र पंक्चर काढणारे, टेलर, चहावाले आणि छोट्या दुकानदारांची आर्थिक स्थिती पाहून त्यांना हे गाळे मोफत देण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले. या गाळ्यांचे वाटप पंचायत समिती कार्यालयात पारदर्शकपणे चिठ्ठीद्वारे केले जाईल आणि यात कोणत्याही पुढारी किंवा पदाधिकाऱ्याला स्थान नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय प्रवासावर भाष्य करताना ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही जनतेने दिलेले प्रेम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे आज जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मिळाले. कार्यकर्त्यांनी पदामागे न धावता जनतेची कामे करावीत. यावेळी त्यांनी परिसरातील पाणीप्रश्न, गोदावरी कालव्याची कामे, मोरवाडी तलाव अतिक्रमण मुक्ती आणि नगर-मनमाड महामार्गावरील पथदिव्यांच्या कामांचा आढावा घेतला.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी तालुक्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कठोर भूमिका घेण्याचा इशारा देत, पाणी, रोजगार आणि विकासाला कोणताही जात-धर्म नसतो, असे त्यांनी ठणकावून सांगितले. कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खर्चातून केलेले भव्य स्वागत आणि प्रेम पाहून ते भावूक झाले. गावातील मतभेद विसरून विकासासाठी सर्वांनी एकजुटीने पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.






