प्रवीण पुरो –
राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील कर्तबगार नेते दिवंगत अजितदादा पवार यांच्या मृत्यूला आता वर्ष होईल. या सचोटीच्या नेत्याच्या मृत्यूलाही न्याय न देणारी देशातील बांडगूळं सध्या दादांच्या नावाने गळे काढत आहेत. ही माणसं इतकी स्वार्थी, माणूसघाणी आणि मतलबी आहेत की याची तुलना नाही करता येत. ज्या दादांना यांनी सळो की पळो करून सोडलं तेच आज दादांच्या आरत्या ओवाळू लागले आहेत. दादांच्या कथित अपघाताचं कारण बनलेल्या घटनेची म्हणजे झालेल्या विमान अपघाताची साधी चौकशी न करणारी बांडगूळं आता डोळ्यात नक्राश्रू आणत श्रद्धांजलीचं नाटक करत आहेत. या नाटकाचा एक अंक नुकताच पुण्यात पार पडला. पुणे जिल्हा परिषदेने उभारलेल्या दादांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या उद्घाटनात दादांवर स्तुतीसुमनं उधळणाऱ्या बांडगुळांनी आपणच दादांचे तारणहार आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न केला. या पुतणामावशीच्या प्रेमाचा आता राज्यातल्या जनतेलाही उबग आला आहे. राजकारणी किती खोटं बोलतात, याचं प्रत्यंतर राज्यातली जनता घेत आहे. या राजकारण्यांच्या खोटारडेपणाला हद्द राहिलेली नाही, हे दादांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने दिसून आलं. आपण लाजलज्जा सोडलेली आहे, असंच जणू हे राजकारणी सांगायला या कार्यक्रमाला उपस्थित होते की काय, असा प्रश्न पडतो. आपल्याच एका सहकार्याशी दुसरा किती निष्ठूर वागू शकतो, हे याचं ज्वलंत उदाहरण म्हणता येईल.
दादांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी हे प्रकरण लावून धरलं नसतं तर सत्ताधाऱ्यांनी राज्यातल्या जनतेच्या नजरेतून दादांना केव्हाच पडद्याआड पाठवलं असतं. दिवंगत दादांच्या स्मृती तेवत ठेवण्याची जशी सत्ताधाऱ्यांना आवश्यकता वाटत नाही, तशी ती त्यांच्या पक्षातील नेत्यांनाही वाटेनाशी झाली आहे, हे त्या पक्षातल्या नेत्यांच्या वर्तनावरून लक्षात येतं. दादांना न्याय मिळण्यापेक्षा आपल्याला काय मिळेल, या अपेक्षेने पक्षातल्या नेत्यांनी या प्रकरणाचा वापर केला. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज्यातील काँग्रेस पक्षाने रोहित पवारांना पाठिंबा दिला नसता तर कोण दादा हे विचारण्याची वेळ आली असती. या प्रकरणाचा पाठपुरावा करतील अशी ज्या शरद पवारांकडे लोक अपेक्षा करत होते, त्यांनी यावर साधी वाच्यता केलेली दिसत नाही. त्यांचा वारसा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या सुप्रिया सुळे तर आता हातच वर करू लागल्या आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांच्या वर्तनाचंही काही वाटत नाही. त्यांचे पाय कोणत्या वळणावर आहेत, हे सांगणार्या या घटना होत. यामुळे दादांना जो काही न्याय मिळायचा ते एकट्या रोहित पवारांच्या प्रयत्नाचं फळ असेल, असं चित्र आहे. म्हणूनच दिवंगत दादांना न्याय मिळावा म्हणून राज्यातल्या प्रामाणिक जनतेने रोहित पवारांच्या मागे ठाम राहिलं पाहिजे.
राज्यात भाजप युतीचं सरकार आल्यापासून दादांच्यामागे सिंचन घोटाळ्याचं भूत लावण्यात आलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपकडून होत असलेल्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा केली तेव्हापासून अजित पवारांच्या मागे शुक्लकाष्ट लागलं. या कथित घोटाळ्याची डॉ. माधव चितळे यांच्या नेतृत्वाखालील समितीकरवी चौकशी झाली. समितीने यासाठी संबंधित विभागातील नियामक मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, अधिकारी आणि अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करताना त्यांना दोषी धरलं आणि अजित पवारांना क्लीनचिट दिली. मात्र तरीही हे प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे स्वतंत्र चौकशीसाठी देण्यात आलं. या विभागानेही दादांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचं अहवालात नमूद केलं. दरम्यानच्या काळात विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांनी दादांना इतकं बदनाम केलं की ७० हजार कोटींचे धनी हे जणू अजित पवारच, असा पद्धतशीर प्रचार करण्यात आला. राज्यात फडणवीसांचं सरकार आलं तेव्हा हे अहवाल खुले करावेत, अशी मागणी झाली. मात्र फडणवीस सरकारने हे अहवाल स्वीकारले नाहीत आणि त्यांची पुन्हा चौकशीही केली नाही. दादांना बदनाम करण्यासाठी या प्रकरणाचा पद्धतशीर वापर मात्र करून घेतला. सत्ताधाऱ्यांच्या तो इतका अंगवळणी पडला की यामुळे विरोधकांची पुरती कोंडी झाली. दादांच्या पाठीवर कथित सिंचन घोटाळ्याचं भूत लावून सत्ताधाऱ्यांनी त्यांना जेरीस आणलं.
त्याआधी खोट्या केसेसचा आधार घेत सत्तेने अनिल देशमुख, संजय राऊत यांना डांबण्यात आलं. कथित सिंचन घोटाळ्याच्या चौकशीच्या निमित्ताने दादांना पुरतं बेजार करण्यात आलं. फडणवीसांनी तर चक्की पिसिंगची टेप वाजवली. राज्यात सत्ता मिळावी म्हणून भाजपचे नेते इतक्या खालच्या पातळीवर उतरले की त्यांनी दादांना तुरुंगाची भीती दाखवून सत्ता बळकट करण्याचं कारस्थान रचलं. ही आफत आपल्यावर येऊ नये म्हणून नरेंद्र मोदींनी दिलेल्या कारवाईच्या इशाऱ्याबरहुकूम दादा सत्तेत सहभागी झाले, हा विद्यमान सत्तेचा इतिहास होय.
सत्तेत अर्थमंत्रीपद भूषवणार्या दादांना राज्याचा आर्थिक गाडा किती तकलादू आहे, याची जाणीव होती. त्यात पार्टीफंडासाठी भाजप राज्याची कशी लूट करत आहे, याची अनेक प्रकरणं दादांच्या दप्तरी जमा होती. याची जाहीर वाच्यता दादांनी काही पत्रकारांकडे आणि वाहिन्यांच्या चर्चेदरम्यान केली होती. पुरंदर उपसा सिंचन योजनेतील प्रकल्पाची किंमत २३० वरून ३३० कोटी कशी झाली, याचा पोलखोल स्वतः दादांनी एका वाहिनीच्या चर्चेत केला होता. पवारांनी अशा अनेक फाईल्सचा अभ्यास केला ज्यात कामांच्या किंमती दुपटीने वाढवून त्या रकमा पार्टीफंडासाठी वळवल्या जात असल्याचं त्यांना कळलं होतं. ज्यांच्या हस्ते दादांच्या अर्धपुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं ते गृहमंत्री अमित शहा पवारांविषयी आता गळे काढत असले तरी २०१९ मध्ये झालेल्या कराडच्या सभेत त्यांनी पवारांवर केलेली अत्यंत कडवट टीका कोणीही विसरू शकत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून किंमत नसलेले भाजप नेते तेव्हा अजित पवारांवर तुटून पडले होते.
दादांच्या विमानाला अपघात झाला की त्यांचा घात करण्यात आला याविषयी अनेक प्रवाद आहेत, हे जरी खरं असलं तरी रोहित पवार यांनी पुढे आणलेले पुरावे आणि तांत्रिक बाबी लक्षात घेता राज्याच्या सरकारने विशेष बाब म्हणून स्वतःहून हे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे देणं अपेक्षित होतं. दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते. यामुळे तर राज्य सरकारने अधिक जबाबदारीने या प्रकरणाचा निपटारा करायला हवा होता. विधिमंडळात व्यक्त झालेल्या संशयाची खातरजमा करण्याची जबाबदारी ज्या सरकारवर होती त्या सरकारने याकडे पुरतं दुर्लक्ष केलं आणि आपल्यावरील जबाबदारी केंद्रावर ढकलली. विरोधकांना ईडीच्या कोठडीत डांबण्यासाठी जी तत्परता फडणवीस आणि त्यांच्या सत्तेने दाखवली तीच अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीसाठी दाखवली असती तर मफलरमॅन म्हणून त्यांचं नाव घेण्याची हिंमत रोहित पवारांना झाली नसती. दादांचा बारामती दौरा अचानक रद्द होणं, दुसऱ्या दिवशी पहाटेच्या विमानाची व्यवस्था परस्पर करणं, दादांच्या बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून न देणं, विमान अपघातात सापडलेल्या फाईलमधील कागदपत्र जशीच्या तशी राहणं या साऱ्या गोष्टी दादांचा मृत्यू विमान अपघातात झाला हे सांगायला धीर होता नाही. उपमुख्यमंत्री असलेल्या नेत्याचा अपघातात मृत्यू होऊनही त्याचा साधा एफआयआर राज्यातले पोलीस नोंदवून घेत नाहीत, यावरून संशयाची सुई कुठे जाते हे सांगायची आवश्यकता नाही. एफआयआर नोंदवू नका, असा आदेश देणारा नेता कोण, याचा उकल झाला की यामागच्या शक्ती उघड पडतील, हे रोहित यांचं म्हणणं योग्यच आहे. व्हीआरएस या विमान कंपनीच्या संबंधितांना मुख्यमंत्री पाठीशी घालत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. हा आरोप करताना व्ही. के. सिंग यांच्या पुत्राच्या विवाहासाठी जयपूरमध्ये जाणं यावर आक्षेप नोंदवणं म्हणजे थेट मुख्यमंत्र्यांना गोवणं असं नाही, हे सामान्यांना कळतं ते दादाच्या बहिणीला म्हणजे सुप्रिया सुळे यांना कळू नये?






