महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या साठ्यातून सध्या आवर्तनाचा लाभ दिला जात असला तरी आगामी काळ अधिक आव्हानात्मक असून, यापुढील आवर्तने केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच आरक्षित राहतील. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळून पाण्यासह अनावश्यक खर्चातही बचत करावी, असे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
राहाता येथे आयोजित टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. मागील बैठकीत दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीस अपर जिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, ज्ञानेश्वर गोंदकर, नगराध्यक्ष जयश्री थोरात, उपनगराध्यक्ष अभय शेळके यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. गोदावरी व निळवंडे धरणातून सोडलेल्या आवर्तनामुळे मोठा दिलासा मिळाल्याबद्दल बैठकीत मंत्री विखे पाटील यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
मंत्री विखे यांनी यावेळी बोलताना टंचाई परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गावनिहाय चारा उत्पादनाचे नियोजन करण्यासाठी कृषी सहाय्यक आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी समन्वयाने तातडीने सर्वेक्षण करावे, अशा सूचना दिल्या. भविष्यातील पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेता मुळा आणि कुकडीच्या सुरू असलेल्या आवर्तनादरम्यान कोठेही अनधिकृत पाणी उपसा होणार नाही, याची अधिकाऱ्यांनी कडक दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी वाकडी, चितळी, आडगाव आदी गावांतील ग्रामस्थांनी पाणी आणि चारा प्रश्नाबाबत सूचना मांडल्या. साकुरी गावाच्या पाणीपुरवठा योजनेचे ८० टक्के काम पूर्ण होऊनही उर्वरित काम रखडल्याने ग्रामस्थांना पाणी मिळत नसल्याचे निदर्शनास येताच मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
दुष्काळी परिस्थितीत पशुधन हाच ग्रामीण भागाचा मुख्य आधार असल्याने पशुधन वाचवण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे. गावपातळीवरील पशुपालक आणि चारा उत्पादनास इच्छुक शेतकऱ्यांची माहिती अद्याप संकलित न केल्याबद्दल त्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. सध्याच्या आवर्तनातून रब्बी पिकांना आधार मिळणार असला तरी शेतकऱ्यांनी चारा उत्पादनासाठी या पाण्याचा प्राधान्याने लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत ५० हजार रुपये अनुदानास पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्राप्त झाल्या आहेत, मात्र बँकांकडून जादा व्याज आकारले जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी बैठकीत केल्या. या शंकांचे निरसन करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी बुधवारी विशेष बैठक घ्यावी, तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयात थांबून गावनिहाय वीज प्रश्नांचे निराकरण करावे, असे आदेश मंत्री विखे पाटील यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने इतर खर्चांना फाटा देऊन केवळ दुष्काळ निवारणावर लक्ष केंद्रित केले असून, यापुढे दर महिन्याला विभागनिहाय आढावा बैठका घेतल्या जातील. पाण्याबरोबरच कौटुंबिक खर्चावरही नियंत्रण आणणे काळाची गरज आहे. विवाह सोहळ्यांवरील अनावश्यक खर्च टाळून केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत साधेपणाने विवाह पार पाडावेत. राहाता तालुक्याने या उपक्रमाची सुरुवात करून संपूर्ण राज्यासमोर एक नवा आदर्श निर्माण करावा, असे ते म्हणाले.






