महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
ग्रामविकास, जलसंधारण, आदर्श दुग्धव्यवसाय आणि सेंद्रिय शेतीतील नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून सावरगाव तळ येथील शेतकऱ्यांनी उभे केलेले विकासाचे मॉडेल अत्यंत प्रेरणादायी असून संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी काढले.
तहसीलदारांनी शिष्टमंडळासह सावरगाव तळ येथे भेट देऊन गावातील विविध विकासकामांची व प्रयोगांची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणी दौऱ्यादरम्यान तहसीलदार मांजरे यांनी बाळासाहेब यादव नेहे यांच्या बीआरसी (सेंद्रिय निविष्ठा निर्मिती) केंद्राला भेट देऊन माहिती घेतली. शेतीमध्ये रासायनिक औषधांचा वाढता वापर लक्षात घेता सेंद्रिय औषधे व निविष्ठा निर्मितीचा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आणि काळाची गरज असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
दरम्यान, गावातील अत्यल्प भूधारक शेतकरी गोरक्षनाथ राधाकिसन थिटमे यांचा दुग्धव्यवसाय पाहून शिष्टमंडळातील सर्वच सदस्य भारावून गेले. केवळ १० गुंठे जमीन असतानाही त्यांनी ३० गायींच्या माध्यमातून दररोज सुमारे ४०० लिटरपेक्षा अधिक दूध उत्पादन घेतल्याची बाब कौतुकास्पद ठरली. मर्यादित जागेत आणि उपलब्ध साधनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून यशस्वी दुग्धव्यवसाय कसा उभारता येतो, याचा हा वस्तुपाठ असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
शिष्टमंडळाने गावाने २०१९ मध्ये पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून केलेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी केली. तसेच गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटाच्या माध्यमातून तब्बल १२ किलोमीटर अंतरावरून पाइपलाइनद्वारे आणलेली पाणी योजना, समान पाणी वाटप व्यवस्था आणि सामूहिक नियोजनातून राबविलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. आधुनिक तंत्रज्ञान, पीक नियोजन आणि सामूहिक एकजुटीच्या बळावर पाणीटंचाई तसेच आर्थिक अडचणींवर मात करता येते, हे सावरगाव तळने सिद्ध केले आहे.
सामूहिक सहभाग, नियोजन आणि कष्टाच्या जोरावर सावरगाव तळने ग्रामविकास व पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात उभारलेला हा आदर्श इतर गावांसाठीही मार्गदर्शक असल्याची भावना तहसीलदारांसह मान्यवरांनी व्यक्त केली.
याप्रसंगी पोलीस पाटील गोरक्ष नेहे, संगमनेर महाविद्यालयाचे प्रबंधक संतोष फापाळे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब नेहे, दूध संस्थेचे संचालक संदीप थिटमे, संदीप गुंजाळ, संदीप येंधे, राजहंस दूध संघाचे संचालक डॉ. प्रमोद पावसे, भीमाशंकर नेहे, वाटर संस्थेचे अजित फापाळे, राहुल फापाळे, ॲड. संदीप नलावडे यांच्यासह विवेकानंद प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






