महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण करण्याबरोबरच त्यांच्याशी संबंधित सत्य, स्मृती आणि सांस्कृतिक संदर्भ यांचे जतन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ऐतिहासिक वारसा हा केवळ भूतकाळाचा ठेवा नसून तो आपल्या पुढील पिढ्यांसाठी प्रेरणेचा स्रोत आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारशांच्या संवर्धनाबाबत समाजात व्यापक जागरूकता निर्माण होण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन लेखिका व प्रसिद्ध वास्तुविशारद काजल महेश जंजिरे यांनी केले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्याची साक्ष देणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील ऐतिहासिक धर्मवीर गडाची सविस्तर माहिती देणाऱ्या काजल जंजिरे लिखित ‘धर्मवीर गड’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच धर्मवीर गडाच्या ऐतिहासिक परिसरात उत्साहात पार पडला. आमदार विक्रमसिंह पाचपुते आणि आमदार हेमंत ओगले यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी इतिहास, साहित्य, सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना काजल जंजिरे यांनी पुस्तकाच्या निर्मितीमागील प्रवास उलगडला. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचे विविध पैलू आणि पेडगावच्या धर्मवीर गडाचा समृद्ध ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या पुस्तकाची निर्मिती केल्याचे त्यांनी सांगितले. ऐतिहासिक स्थळांविषयी केवळ माहिती देणे पुरेसे नसून त्या स्थळांचे महत्त्व, त्यामागील इतिहास आणि त्यांच्याशी जोडलेल्या सांस्कृतिक आठवणी समाजापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. या दृष्टीने ‘धर्मवीर गड’ हे पुस्तक महत्त्वपूर्ण माध्यम ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रियेत पती महेश ईश्वर जंजिरे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगताना काजल जंजिरे यांनी त्यांच्या पाठबळाचा विशेष उल्लेख केला. केंद्रीय राखीव पोलीस दलात सहायक कमांडंट म्हणून कार्यरत असलेले महेश जंजिरे यांनी दिलेले प्रोत्साहन, सहकार्य आणि योगदान, तसेच सासू-सासरे आणि आई-वडिलांचे आशीर्वाद यामुळेच पुस्तकनिर्मितीचा हा प्रवास यशस्वीपणे पूर्ण करता आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
आमदार हेमंत ओगले यांनी लेखिका काजल जंजिरे यांच्या कार्याचे कौतुक करताना, पेडगावच्या स्नुषेने धर्मवीर गडाचा इतिहास पुस्तकाच्या माध्यमातून शब्दबद्ध करणे ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. या पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य आणि धर्मवीर गडाचे ऐतिहासिक महत्त्व राज्यातील विधानसभा व विधान परिषदेच्या सर्व आमदारांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ऐतिहासिक वारशाची माहिती लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचल्यास त्याच्या संवर्धनासाठी व्यापक प्रयत्नांना चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी काजल जंजिरे यांचे विशेष कौतुक केले. काष्टी गावची लेक असलेल्या काजल या सिद्धहस्त लेखिका, चाणाक्ष व चतुर संशोधक आणि उत्कृष्ट वास्तुविशारद असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या कार्यामुळे काष्टी गावासह संपूर्ण परिसराची मान उंचावली आहे. धर्मवीर गडाच्या संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण पुढाकार घेतला असल्याचेही पाचपुते यांनी स्पष्ट केले. ऐतिहासिक वास्तूंचे जतन करून त्यांचे महत्त्व पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी ज्येष्ठ नेते ॲड. डी. डी. घोरपडे, इतिहासकार प्रा. डॉ. नवनाथ वाव्हळ, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय अध्यक्ष जयंत येलूलकर, कवी चंद्रकांत पालवे, नेत्रदूत जालिंदर बोरुडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, निवृत्त आयपीएस अधिकारी हेमंतराजे गायकवाड, पेडगावचे सरपंच इरफानभाई पिरजादे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. वक्त्यांनी धर्मवीर गडाच्या ऐतिहासिक महत्त्वावर प्रकाश टाकत अशा पुस्तकांच्या माध्यमातून इतिहास जतन होण्याची आवश्यकता व्यक्त केली.
गणराज प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला वरिष्ठ पत्रकार आणि मुंबई उच्च न्यायालयातील वकील डॉ. बाळासाहेब बोठेपाटील यांची प्रस्तावना लाभली आहे. पुस्तकाच्या निर्मितीसाठी ‘गणराज’चे संचालक प्रा. गणेश भगत, ‘क्रिएटिव्ह कम्युनिकेशन्स’चे संचालक व ज्येष्ठ संपादक जयंतराव देशपांडे आणि गणेश मुद्रणालयाचे संचालक गणेशसेठ दळवी यांचे वेळोवेळी सहकार्य लाभल्याचे काजल जंजिरे यांनी आवर्जून नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ॲड. डॉ. बाळासाहेब बोठेपाटील यांनी प्रास्ताविक केले. लेखिका काजल जंजिरे यांचे सासरे ईश्वर जंजिरे, सासू सुनीता जंजिरे, वडील सुनील दरेकर, आई अश्विनी दरेकर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश जंजिरे आणि युवा नेते महेश दरेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. पत्रकार विशाल चव्हाण यांनी आपल्या खास खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले, तर प्रा. डॉ. गणेश भगत यांनी आभार मानले.
या सोहळ्यास राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह महेश जंजिरे यांचे राज्यभरातील विविध शासकीय विभागांत कार्यरत असलेले स्नेही अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुस्तक प्रकाशनानंतर उपस्थित मान्यवरांनी सुमारे ९० एकर परिसरात विस्तारलेल्या धर्मवीर गडाची पाहणी केली. गडावरील ऐतिहासिक वास्तू, मंदिरे आणि विविध वारसास्थळांची माहिती घेत उपस्थितांनी या ऐतिहासिक ठेव्याच्या संवर्धनाची गरज अधोरेखित केली.






