महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
संगमनेर नगरपरिषदेने नव्याने उभारलेल्या १,००० आसन क्षमतेच्या ‘कवी अनंत फंदी अत्याधुनिक बंदिस्त नाट्यगृहा’चे लोकार्पण मोठ्या उत्साहात आणि रसिक प्रेक्षकांच्या तुडुंब गर्दीत पार पडले. हे नाट्यगृह तालुकास्तरावरील राज्यातील सर्वात मोठे आणि अद्यावत सुविधांनी सज्ज असलेले नाट्यगृह ठरले असल्याचे गौरवोद्गार अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी काढले, तर या वास्तूमुळे संगमनेरच्या सांस्कृतिक वैभवात मोठी भर पडल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
या ऐतिहासिक सोहळ्याला थोरात, अभिनेते दामले यांच्यासह आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, उद्योगपती राजेश मालपाणी, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख आणि मुख्याधिकारी डॉ. दयानंद गोरे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लोकार्पण सोहळ्यानंतर प्रशांत दामले यांच्या ‘शिकायला गेलो एक’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगला, याला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
याप्रसंगी अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला. यामध्ये पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे, महापौर ज्योतीताई गाडे, धनश्री सुजय विखे पाटील (लोणी), शितल संग्राम जगताप (नगर), लेखिका शेफाली समीर भुजबळ (नाशिक), प्रियंका अक्षय कर्डिले (नगर), राणीताई निलेश लंके (पारनेर), सुनीता शंकरराव गडाख (नेवासा), डॉ. धनिषाताई पानगव्हाणे (नाशिक), गीतांजली शेळके (महानगर बँक), अनुराधा नागवडे (श्रीगोंदा) आणि जिल्हा बँकेच्या संचालिका संगीता वाघ यांचा समावेश होता. तसेच राहुरीचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, कोपरगावचे नगराध्यक्ष पराग संधान आणि नंदुरबारचे मुख्याधिकारी डॉ. राहुल वाघ हेदेखील उपस्थित होते.
प्रशांत दामले म्हणाले की, संगमनेर शहर व तालुक्याला मोठी सांस्कृतिक परंपरा लाभली असून येथील प्रेक्षकांनी नाटकांना नेहमीच उत्तम प्रतिसाद दिला आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या नाट्यगृहासाठी सातत्याने पाठपुरावा केला. राज्यातील सर्वोत्तम नाट्यगृहांचा अभ्यास करून या वास्तूचे डिझाईन करण्यात आले असून, १,००० आसन क्षमता असलेले हे नाट्यगृह भविष्यात कलाक्षेत्राला नवी दिशा देईल आणि येथे नाटक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कवी अनंत फंदी यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, अनंत फंदी यांनी आपल्या फटक्यांमधून राज्याच्या सांस्कृतिक वैभवात मोठी भर घातली. संगमनेरच्या अनेक कलाकारांनी साहित्य व कलाक्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. अनेक वर्षांच्या पाठपुराव्यातून हे अद्यावत नाट्यगृह उभे राहिले असून याचा सार्थ अभिमान आहे. या प्रकल्पासाठी आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्षा व त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेल्या परिश्रमाबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
आमदार सत्यजित तांबे यांनी या वास्तूचा प्रवास उलगडताना सांगितले की, कवी अनंत फंदी यांनी तमाशा व कीर्तनाच्या माध्यमातून लोकसेवा करत साहित्य क्षेत्राला मोठी देणगी दिली. दुर्गाताई तांबे यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात २०११ मध्ये या कामास मंजुरी मिळाली होती. त्यानंतर विविध विभागांच्या मंजुऱ्या घेत आणि अनेक अडचणींवर मात करत आज हे नाट्यगृह रसिकांच्या सेवेत दाखल झाले आहे. शाहीर विठ्ठल उमप, कांताबाई सातारकर, रघुवीर खेडकर अशा दिग्गजांचा वारसा असलेल्या संगमनेरमधील कला व क्रीडा क्षेत्राला बाळासाहेब थोरात यांनी नेहमीच राजाश्रय दिला आहे. उत्तम आसनव्यवस्था व अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या या नाट्यगृहाच्या रूपाने ‘संगमनेर २.०’ मधील एक महत्त्वाचे स्वप्न सत्यात उतरल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे यांनी केले. सूत्रसंचालन स्मिता गुणे व निलेश पर्वत यांनी केले, तर उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख यांनी आभार मानले. या सोहळ्याला माजी नगराध्यक्ष दिलीपराव पुंड, विश्वासराव मुर्तडक, कैलास लोणारी, अरुण वाकचौरे, नगरसेवक, सोमेश्वर दिवटे, सुवर्णाताई मालपाणी, मनीष मालपाणी, प्रा. डॉ. संजय दळवी, बाळासाहेब घोडके, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष निखिल पापडेजा यांच्यासह नाट्यप्रेमी रसिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






