महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर : बंद घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश करत पाच तोळे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दागिने चोरास पोलीस उपाधीक्षक व शहर पोलिसांच्या पथकाने पकडले आहे. पकडलेल्या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून या गुन्ह्यामध्ये एका अल्पवयीन आरोपीसह एका महिलेचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच पकडलेल्या आरोपीकडून आणखी काही गुन्हे समोर आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
इम्रान चाँद शेख (वय 29 वर्षे, मुळ रा. एकतानगर, संगमनेर, ता. संगमनेर हल्ली रा. गल्ली नं 1, रमजानपुरा, ता. मालेगाव जि. नाशिक) असे पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. या आरोपीसोबत पोलिसांनी त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेवुन केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी हा गुन्हा महिला साथीदारासोबत मिळुन केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
2 ऑक्टोंबर रोजी शहरातील रहेमतनगर भागात राहणाऱ्या इम्रान सलीम शेख यांच्या बंद घराचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी पाच तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस पथकातील पोलीस नाईक राहुल कचरु डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल कैलास सारवंदे, संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार रावसाहेब लोंखडे, पोलीस नाईक भागा किसन धिंदळे, पोलीस कॉन्स्टेबल अजित बाळु कुऱ्हे, पोलीस कॉन्स्टेबल आत्माराम पवार, अपर पोलीस अधिक्षक कार्यालयाचे पोलीस नाईक सचिन धनाड व पोलीस कॉन्स्टेबल आकाश बहिरट यांनी या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करत इम्रान शेख व त्याच्या अल्पवयीन साथीदाराला अटक केली होती.
पकडलेल्या आरोपीकडून पोलिसांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आणखी तीन गुन्ह्यांचा या आरोपींकडून उलगडा केला आहे. तसेच चोरीतील काही सोने देखील हस्तगत केले आहे. पकडलेल्या आरोपीकडून आणखी काही गुन्हे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान शहर पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याकडून काही सोने हस्तगत केले आहे. तर आरोपीने काही सोनारांना सोन्याची विक्री देखील केल्याची माहिती मिळत असून हे सोनार पोलिसांच्या रडारवर आले आहे. यामुळे सोनारांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान चोरीचे सोने घेणाऱ्या सोनार यांना पोलीस आरोपी करतात की नाही हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.



