महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर @ अनंत पांगारकर
भल्या पहाटे संगमनेरच्या तुरुंगातील चार आरोपींनी पलायन केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी समोर आल्यानंतर गार्डच्या बंदोबस्तावरील तीन पोलीस कर्मचारी अडचणीत सापडले असतानाच दुसरीकडे जळगाव कारागृहातील कैद्याला भेटू देण्यासाठी दोन हजाराची लाच घेणाऱ्या जेलच्या सुभेदारासह अन्य दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
त्यामुळे बुधवारचा दिवस संगमनेर आणि जळगाव या दोन्ही कारागृहातील गार्डसाठी काळा दिवस ठरला आहे. विशेष म्हणजे दोन्ही ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. संगमनेर मध्ये झालेल्या आरोपी पलायन प्रकरणावेळी एक महिला कर्मचारी ड्युटीवर होती. तर जळगावच्या प्रकरणात दोन महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

जळगाव कारागृहातील कैद्याला भेटू देण्यासाठी जेलच्या सुभेदारासह दोन महिला पोलीस कर्मचार्यांनी तक्रारदाराकडे दोन हजारांची लाच मागितली होती. तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना बुधवारी (8 नोव्हेंबर) दुपारी दीड वाजता एसीबीच्या पथकाने या तिन्ही कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले.
भीमा उखडू भील (वय 53 वर्ष, सुभेदार, रा. महाबळ रोड, तापी पाटबंधारे, जाणता राजा व्यायाम शाळेजवळ, वर्षा बिल्डिंग, 2 रा मजला, रूम नं 8, जळगाव, मूळ रा. दत्त मंदिरजवळ, मु. पो. जयनगर, ता. शहादा, जि.नंदुरबार), हेमलता गयभू पाटील (वय 29 वर्ष, महिला कारागृह शिपाई, रा. प्लॉट नंबर 1/5/3, गट नं 180, गिरणा पंपिंग रोड, वाघनगर दत्त मंदिर समोर) व पूजा सोपान सोनवणे (वय 30 वर्ष, महिला कारागृह शिपाई, रा. कारागृह कॉटर्स क्र. 2, जिल्हा अधिकारी कार्यालय आवार, जळगाव) अशी एसीबीने पकडलेल्या तिघा पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
काय आहे प्रकरण
पहूरच्या अंगणवाडीत शिक्षिका असलेल्या तक्रारदार यांचा मुलगा 307 च्या गुन्ह्यात संशयित आरोपी असून त्याची जळगाव कारागृहात रवानगी करण्यात आली. मुलाला भेटण्यासाठी तक्रारदार आईकडे लाचखोर ड्युटीवरील कर्मचारी दरवेळी दोन हजारांची लाच मागत होते. तक्रारदाराची लाच द्यावयाची परीस्थिती नसल्याने त्यांनी मंगळवारी धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर बुधवारी सापळा रचण्यात आला. तिघाही संशयितांनी दोन हजारांची लाच भेट घडवून आणण्यासाठी मागितल्याने त्यांना बुधवारी दुपारी दिड वाजता लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. महिला पोलिस हेमलता पाटील यांनी लाच स्वीकारली तर लाच स्वीकारण्यासह अन्य दोघांनी सहाय्य केल्याने त्यांना अटक करण्यात आली.
यांनी केली कारवाई…
हा सापळा धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, रामदास बारेला, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, सुधीर मोरे आदींच्या पथकाने यशस्वी केला.

