महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगर: पारनेर शहरातील कुंभार गल्लीमध्ये घराच्या जागेच्या वादातून भरधाव कार अंगावर घालून शेजारी महिलेसह तिच्या अडीच वर्षांच्या मुलाची निघृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. कार चालकाविरोधात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शीतल अजित येणारे (२७) व स्वराज येणारे (वय अडीच वर्षे) अशी मृत माय-लेकाची नावे आहेत. गुरुवारी (२३ नोव्हेंबर) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पारनेरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला.
या संदर्भात मृत महिलेची सासू चंद्रकला शिवाजी येणारे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी किरण राजाराम श्रीमंदिलकर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी किरण श्रीमंदिलकर फरार झाला आहे.
श्रीमंदिलकर व येणारे कुटुंब शेजारी-शेजारी राहतात. घराशेजारच्या जागेच्या मोजणीतून दोन्ही कुटुंबांत वाद होता. किरण श्रीमंदिलकर हा येणारे कुटुंबाला नेहमी जिवे मारण्याची धमकी देत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अशी घडली घटना…
गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास घरासमोरच्या जागेत शीतल येणारे या त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा स्वराज याला जेवण भरवत होत्या. त्याचवेळी आरोपी किरण श्रीमंदिलकर याने भरधाव कार (एमएच १२ आरटी २७७७) शीतल व स्वराज यांच्या अंगावर घातली. मोठा आवाज आल्याने शीतलच्या सासू चंद्रकला घराबाहेर आल्या. त्यांना कारखाली शीतल व स्वराज रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. किरण श्रीमंदिलकर चालकाच्या सीटवर बसला होता.
आवाज ऐकून परिसरातील लोक जमा झाले. त्यांनी जखमी शीतल व स्वराज यांना गाडीखालून बाहेर काढून खासगी रुग्णालयात हलवले. पण प्रकृती गंभीर असल्याने शीतलला नगरच्या शासकीय, तर स्वराजला विळद घाटातील विखे पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान शीतलचा गुरुवारी रात्री, तर स्वराजचा मध्यरात्री मृत्यू झाला.
शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पारनेर येथील स्मशानभूमीत दोन्ही माय-लेकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. अंत्यविधीनंतर मोठा जमाव पोलीस ठाण्यात दाखल झाला. आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली.

