महाराष्ट्र संवाद न्यूज
एका लग्न समारंभात अल्पवयीन मुलीशी झालेल्या ओळखीनंतर तिचे नको त्या अवस्थेतील फोटो काढून ते समाज माध्यमात व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या फोटोग्राफरविरुद्ध अहमदनगर मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी महेश गोवर्धन कराळे (वय २३, रा. आगडगाव ता. नगर, हल्ली रा. नालेगाव, दिल्ली गेट) याच्याविरोधात विनयभंग, अत्याचार, पोक्सो आदी कलमान्वये गुरूवारी (दि. २३) रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
१४ डिसेंबर २०२२ रोजी पीडित मुलगी केडगाव येथे मावस भावाच्या लग्नासाठी गेली होती. त्यावेळी तिची तेथे फोटोग्राफीसाठी आलेल्या महेश कराळे सोबत तिची ओळख झाली होती. आरोपीने तिला त्यानंतर इंस्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यातून त्याने मुलीचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर आरोपीने तिच्याशी लग्न करण्याचे आम्हीच दाखवत तिला ऑगस्टमध्ये आपल्या भाडोत्री रूमवर नेले होते. येथे त्याने तिच्यावर अत्याचार केल्यानंतर तिचे नको त्या अवस्थेतील फोटो काढून घेतले. आपल्या संबंधाबाबत कोणाला काही सांगितले तर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिल्याचे पीडित मुलीने तक्रारीत म्हटले आहे.
नंतर देखील आरोपीने पीडित मुलीवर वेळोवेळी अत्याचार केले. दरम्यान २० नोव्हेंबर रोजी पीडित मुलीच्या मामाने बायपास येथील पुलावर आपल्या भाची सोबत या फोटोग्राफरला बघितले. त्यानंतर पीडित मुलीने झालेला सर्व प्रकार आपल्या मामाला सांगितला.
यानंतर गुरुवारी रात्री पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी महेश कराळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस पुढील तपास करत आहे.


