शुक्रवार, दिनांक १४ जून २०२४
कॅफे आणि हॉटेलमध्ये नेत अत्याचार केल्याच्या घटना संगमनेरमध्ये समोर आल्या असतानाच आता श्रीरामपूरमधूनही अशीच संतापजनक घटना समोर आली आहे. एका सतरा वर्षीय विद्यार्थिनीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत कॅफे आणि हॉटेलमध्ये नेत तिच्यावर तिघा तरुणांनी अत्याचार केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर तिन्ही संशयित आरोपी पसार झाले आहेत.
एप्रिल २०२४ मध्ये ही घटना घडली. आरोपी हे विद्यार्थिनीचे परिचित असून शहरातील कॅफेमध्ये दोघा तरुणांनी विद्यार्थिनीवर अत्याचार केला. तर त्यानंतर तिला शिर्डी येथे नेण्यात आले. तेथेही तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. श्रीरामपूर शहरातील एका कॅफेत आणि शिर्डीतील एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी शहर पोलिसांनी तिघा तरुणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यामुळे श्रीरामपुरातील कॅफे आणि शिर्डीतील हॉटेल पोलिसांच्या रडारवर आले असून कॅफे आणि हॉटेल चालकासंदर्भात पोलीस काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पैकी एक जण शिरसगाव येथील असून अन्य दोघे माळेवाडी गावातील आहेत. दरम्यान, घटनेतील तीनही आरोपी फरार झाले आहेत. शहर पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणात आणखी काही जणांना आरोपी केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.



