
मुंबई – विशेष प्रतिनिधी
शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापरासाठी लवकरच नियमावली तयार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मध्ये सोशल मीडिया संदर्भात कोणताही उल्लेख नसल्याने, बदलत्या काळानुसार आणि सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, पुढील तीन महिन्यांत नियमांमध्ये बदल करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
शासकीय कर्मचाऱ्यांकडून समाज माध्यमांच्या वाढत्या वापरावर बंधने नसल्याबाबत सदस्य डॉ. परिणय फुके, प्रवीण दरेकर आणि विक्रम काळे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, ज्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासकीय कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा उपयोग जनतेशी संवाद साधण्यासाठी आणि सार्वजनिक हितासाठी करावा. या संदर्भात कठोर नियम तयार करण्याची गरज असून जम्मू-कश्मीर, गुजरात आणि अन्य राज्यांनी तसेच लाल बहादुर शास्त्री अकादमीने तयार केलेल्या नियमांनुसार महाराष्ट्र देखील आपल्या सेवाशर्तींमध्ये सुधारणा करून समाज माध्यमांसंदर्भातील स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे तयार करणार आहे.
या नियमांसंदर्भात पुढील तीन महिन्यांत एक शासन निर्णय जारी करण्यात येईल. या संदर्भात कोणाला सूचना द्यायच्या असल्यास त्यांनी त्या पुढील एक महिन्यात सामान्य प्रशासन विभागाकडे (सेवा) पाठवाव्यात, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.


