
महाराष्ट्र संवाद न्यूज –
एका पोलीस कर्मचाऱ्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना धमकावून त्यांच्याकडून २८ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ही घटना बोपदेव घाटात ६ जून रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या विद्यार्थ्यांची तक्रार आहे की, पुण्याच्या कोंढवा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस शिपाई विक्रम वडतीले आणि त्याचा मित्र केदार जाधव यांनी त्यांना थांबवले. या दोघांनी विद्यार्थ्यांची बँग तपासली आणि हुक्क्याचे साहित्य त्यांच्याजवळ आढळल्याचे सांगितले.

या प्रकरणी, गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन वडतीले आणि जाधव यांनी विद्यार्थ्यांकडून ३० हजार रुपयांची खंडणी मागितली. अखेर, मध्यस्थीनंतर, केदार जाधव याच्या गुगल पेवर २८ हजार रुपये वर्ग करण्यात आले.
तक्रारदार आदनान रझा (रा. चेन्नई) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी त्याच्या दोन मित्रांसह फिरावयास गेला होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नवनाथ जाधव करत आहेत.


