

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेरच्या रोटरी क्लब आणि रोटरी आय केअर ट्रस्टने, दर्शन रोटरी नेत्र रुग्णालया अंतर्गत एक अत्याधुनिक ‘रोटरी डोळ्यांचा फिरता दवाखाना’ सुरू केला आहे. मंगळवारी (१९ ऑगस्ट) मालपाणी लॉन्स येथे एका शानदार कार्यक्रमात या फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी उद्योजक राजेश मालपाणी, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुधीर लातुरे, आणि आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे या व्हॅनचे अनावरण करण्यात आले. संजय आणि गिरीश मालपाणी यांच्यासह संपूर्ण मालपाणी परिवार या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होता.
प्रकल्प प्रमुख रो. संजय राठी यांनी या फिरत्या दवाखान्याची गरज आणि महत्त्व विशद केले, तसेच मालपाणी परिवाराने दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. रोटरी आय केअरचे अध्यक्ष रो. संजय लाहोटी यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली आणि समाजातील दानशूर व्यक्तींना पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी बोलताना मुख्य देणगीदार राजेश मालपाणी यांनी रोटरीच्या जागतिक कार्यापासून प्रेरणा घेऊन आपण या व्हॅनसाठी आर्थिक मदत केल्याचे सांगितले. ते म्हणाले, रोटरी क्लब ऑफ संगमनेरसोबत आमचे संबंध खूप घट्ट आहेत. चांगल्या कामांसाठी भविष्यातही कोणतीही अडचण येणार नाही.
डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुधीर लातुरे यांनी रोटरी क्लबच्या वैद्यकीय, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेतला. त्यांनी आय केअर रुग्णालयाला अत्याधुनिक उपकरणांसाठी सर्वतोपरी आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले.
ओमप्रकाश शेटे यांनी त्यांच्या सामाजिक कार्यात रोटरीने नेहमीच सहकार्य केल्याचे नमूद केले. महाराष्ट्रातील आरोग्य सेवेसाठी रोटरी करत असलेल्या कामाची त्यांनी प्रशंसा केली आणि वैद्यकीय क्षेत्रात आर्थिक मदत करणाऱ्या संस्थांमध्ये रोटरीचे स्थान सर्वोच्च असल्याचे सांगितले.
हा फिरता दवाखाना जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये डोळ्यांची तपासणी शिबिरे आयोजित करण्यासाठी वापरला जाईल. ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज आहे, त्यांना थेट या व्हॅनद्वारे रुग्णालयात आणण्याची सोय उपलब्ध होणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजित काकडे, महेश वाकचौरे, आनंद हासे, बद्रीनारायण इंदाणी, पवनकुमार वर्मा, विश्वनाथ मालाणी, रविंद्र पवार, योगेश गाडे, अरविंद कासट, नरेंद्र चांडक, साईनाथ साबळे, महेश ढोले, विकास लावरे, मोहित मंडलिक, संकेत काजळे, सौरभ म्हाळस, राजेंद्र खोसे आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. भारतभूषण नावंदर आणि मंजु मणियार यांनी केले, तर उपाध्यक्ष रो. दीपक मणियार यांनी आभार प्रदर्शन केले. या सोहळ्याला सर्व रोटरी सदस्य, आय केअर ट्रस्टचे कर्मचारी, तसेच संगमनेर शहरातील अनेक दानशूर नागरिक उपस्थित होते.



प्रकल्प प्रमुख रो. संजय राठी यांनी या फिरत्या दवाखान्याची गरज आणि महत्त्व विशद केले,
ओमप्रकाश शेटे यांनी त्यांच्या सामाजिक कार्यात रोटरीने