
अहिल्यानगर – शिर्डी परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून आणि शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देणारा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख याला स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने अटक केली आहे. शिर्डीतील हॉटेल रेणुका जवळील काटवनात दबा धरून बसलेल्या या आरोपीला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले.
४ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास फिर्यादी दीपक किसन जाधव (रा. लक्ष्मीनगर, शिर्डी) यांचा मुलगा निलेश हा शिर्डीहून सावळविहीर येथे जात होता. यावेळी आरोपी पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख आणि त्याच्या साथीदारांनी निलेशला रस्त्यात अडवले. त्याला पिस्तुलाचा धाक दाखवून, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि आर्म ॲक्टच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. हे पथक आरोपीचा शोध घेत असताना, दि. २६ डिसेंबर रोजी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, आरोपी पाप्या शेख हा शिर्डी परिसरातील फायबर कारखान्याजवळ असलेल्या हॉटेल रेणुकाच्या मागील काटवनात लपून बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ परिसराची नाकेबंदी केली. पोलिसांना पाहताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख (वय ४५ वर्षे, रा. कालीकानगर, शिर्डी) असे आहे. आरोपीला पुढील तपासासाठी शिर्डी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
हे आहे कारवाई करणारे ‘शार्प’ पथक – ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, तसेच पोलीस अंमलदार फुरकान शेख, विजय पवार, राहुल द्वारके, राहुल डोके, भीमराज खर्से, सतिष भवर, सुनिल मालणकर, प्रशांत राठोड आणि प्रमोद जाधव यांच्या पथकाने केली आहे.






