मुंबई | महाराष्ट्र संवाद न्यूज
शेजारी-शेजारी राहणाऱ्या दोन महिलांमध्ये झालेल्या भांडणात दुसऱ्या महिलेला मारहाण करून तिचे कपडे फाडल्या प्रकरणी एका 38 वर्षीय महिला आरोपीला मुंबई महानगर दंडाधिकाऱ्यांनी दोषी ठरविले आहे. त्याशिवाय विनयभंग प्रकरणी एखादी महिलाही दोषी ठरू शकते असे स्पष्ट करत त्या महिलेला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
एक वर्ष कारवासाच्या शिक्षेसह या महिलेला सहा हजार रुपयांचा दंड देखील करण्यात आला आहे. आरोपी आणि तक्रारदार महिला दोघीही एकमेका शेजारी राहत असून या महिलांच्या दोन्ही कुटुंबीयांमध्ये अनेक वर्षांपासून वादविवाद आणि भांडण होत असे.
दोन वर्षांपूर्वी आपसात झालेल्या भांडणांमध्ये आरोपी महिलेने तक्रारदार महिलेवर आधी चप्पल फेकली. त्यानंतर चप्पलने तिला मारहाण केली. यावेळी काही प्रत्यक्ष दर्शनी त्यांच्यात हस्तक्षेप करत भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला असता आरोपी महिलेने तक्रारदार महिलेचा गळा पकडून तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि तिच्या अंगावरील कपडे फाडले. ते तक्रारदार महिलेने पोलिसांना माहिती देताना सांगितले होते.
आरोपी महिलेने मारहाण करून विनयभंग केला तसेच कपडे फाडून जगण्याच्या अधिकाराचा भंग केला. एवढ्यावरच न थांबता पतीला आपल्यावर बलात्कार करण्यास सांगितले. यावेळी घटनास्थळी इमारतीतील सर्व पुरुष उपस्थित होते, असे तक्रारदार महिलेने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले होते. यावर नुकतीच दंडाधिकाऱ्यांसमोर सुनावणी पार पडली.
न्यायालयाचे निरीक्षण तक्रारदार महिलेचा विनयभंग होईल अशी वागणूक आरोपी महिलेने दिली. तक्रारदार महिलेचे कपडे पाडल्याचे साक्षीदारांनी न्यायालयासमोर सांगितले हे बाब न्यायालयासमोर सिद्ध झाल्याने पुरुषांप्रमाणे महिलेकडूनही एखाद्या महिलेवर विनयभंग करण्याच्या हेतूने बळाचा वापर करून किंवा तिला मारहाण करण्यात येत असेल तर आरोपी महिलेलाही विनयभंगाच्या आरोपांतर्गत दोषी ठरविले जाऊ शकते. 
एखाद्या स्त्रीला या आरोपातून वगळण्यात यावे, असे कायद्यात कोठे नमूद करण्यात आलेले नाही, असे न्यायालयाने आरोपी महिलेला विनयभंगाच्या आरोपाप्रकरणी दोषी ठरवताना आदेशात स्पष्ट केले. आरोपी महिला तीन मुलांची आई असल्यामुळे तिला कमाल पाच वर्षाच्या शिक्षा ऐवजी किमान एक वर्षाची शिक्षा सुनावत सहा हजार रुपयांचा दंड केला.

