महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
कोलकत्ता : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने पत्नी हसीन जहाँला दरमहा एक लाख तीस हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश कोलकत्ता न्यायालयाने दिले आहेत.
मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहाँ हिने २०१८ मध्ये न्यायालयात केस दाखल करत पती मोहम्मद शमी यांच्याकडून स्वतःसाठी व मुलीच्या देखभालीसाठी पोटगीची मागणी केली होती. दरम्यान, मोहम्मद शामीचे वार्षिक वेतन हे २०२०-२१ मध्ये जास्त होते. त्यानुसार दरमहा दहा लाख रुपये पोटगीची मागणी करण्यात आली, अशी माहिती हसीनच्या वकील मृगांका मिस्त्री यांनी न्यायालयाला दिली.
शमीचे या काळात वार्षिक उत्पन्न तब्बल ७ कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. याप्रकरणी मोहम्मद शामीचे वकील सेलिम रहमान यांनी देखील कोर्टात युक्तिवाद केला. “हसीन जहाँ स्वतः व्यावसायिक फॅशन मॉडेल म्हणून काम करते. तिचे स्वत:चे उत्पन्न असून तिने पोटगी मागणे चुकीचे आहे”, असे त्यांनी सांगितले.
न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर शमीला हसीन हिला दरमहा १ लाख ३० हजार रुपये पोटगी देण्यास सांगितले. यातील ५० हजार रक्कम ही हसीनला तर उर्वरित रक्कम ही तिच्या मुलीसाठी दिली जाणार आहे. कोर्टाच्या या निकालाबाबत हसीनने कृतज्ञता व्यक्त केली आहे.

