महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी देवेंद्र महाराजांना त्यांच्यातील दिव्यशक्ती सिद्ध करण्याचे आव्हान दिल्यानंतर चर्चेत आलेल्या धीरेंद्र महाराजांबद्दल प्रसिद्ध लेखक, कवी हेरंब कुलकर्णी यांनी समाज माध्यमात केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम सरकार हे नाव सध्या देशभरात प्रसिद्ध झाल आहे. चर्चेत आलेले बागेश्वर महाराज लोकांच्या मनात काय चाललंय, हे अचूक ओळखतात. असा दावा केला जातोय. या बागेश्वर सरकारांच्या दरबारात एकदा हजेरी लावली तर नशीब पालटत अशी श्रद्धा सध्या लोकांच्या मनात आहे. हे महाराज लोकांच्या समस्या त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून जाणतात. तसेच एका कागदावर त्या व्यक्तीला भेडसावत असलेल्या समस्येचे उत्तर लिहून देतात, अशी धारणा आहे. या पार्श्वभूमीवर हेरंब कुलकर्णी यांनी देखील आपल्या मनातील समस्या आपल्या फेसबुक वॉलवर व्यक्त केली आहे. महाराष्ट्र संवादच्या वाचकांसाठी ही पोस्ट प्रसिद्ध करत आहोत.
प्रिय सिद्धीसम्राट बागेश्वर महाराज…
महाराज तुमच्या सिद्धीसोबत
आपण सारे नाचू या
गावागावातील भ्रष्टाचार
तुमच्यासोबत वाचू या
भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या बेडरूममधील
नोटांची बंडले सांगाल का ?
लुप्त होणाऱ्या निधीचा हिशोब
मीडियाच्या वेशीला टांगाल का ?
रेशनच्या गाड्या कुठे होतात लुप्त ?
आश्रमशाळेतील अन्न कुठे होते गुप्त ?
पोलादी भिंत भ्रष्टाचाराची
तुमच्या सिद्धीने वाकवाल का ?
रोजगार हमीच्या मस्टरची नावे
इथून वाचुन दाखवाल का ?
ठेकेदार आणि नेत्यांच्या डिलिंग
तपशील जाहीर कराल का ?
गैरहजर कर्मचाऱ्यांवर
वक्रदृष्टी धराल का ?
दिवसा भांडून रात्री भेटणाऱ्या
नेत्यांना व्हायरल करणार का ?
पक्षनिधी देणाऱ्या उद्योजकांवर
दिव्य कॅमेरा धरणार का ?
बॉम्बस्फोट, हत्या होणार असतात
आधीच तुम्ही का सांगत नाही ?
चीनच्या कुरापती कळायला
सिद्धी तिथे का रांगत नाही ?
अनेक जीव वाचतील महाराज
तुम्ही मनावर घ्या ना
सीबीआय आणि रॉ चे
प्रमुख तुम्ही व्हा ना..
आत्महत्या करणारा शेतकरी
आधीच तुम्ही ओळखून द्या
कुपोषित लेकरांचा दिव्य दृष्टीने
कॅलरीचा हिशोब सरकारला द्या
कागदावर पूर्ण झालेली कामे
दिव्यदृष्टीने वाचा यादी
भगव्या वस्त्रांचा सिद्धीने
लाल फितीच्या लागा नादी
महाराज अगदी शप्पथ सांगतो
गरिबांचे तुम्ही मसीहा व्हा
पंचतारांकित सिद्धी तुमची
आमच्या पालावर घेऊन या..
हेरंब कुलकर्णी

