महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर ¤ शेतात गवत कापणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथे मंगळवारी घडली. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या महिलेला प्राथमिक उपचारानंतर अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मंगळवारी (३१ जानेवारी) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथे ही घटना घडली असून शकुंतला शंकर मैड (वय ५५ वर्ष) असे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. मैड जनावरांसाठी चारा आणण्याकरिता घराजवळील शिवाजी देवराम शेजवळ यांच्या शेतात गेल्या होत्या. बांधाच्या कडेला गवत कापत होत्या. या दरम्यान शेतात डबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानकपणे त्यांच्यावर हल्ला चढविला. अचानक झालेल्या आपल्यावरील हल्ल्यामुळे मैड घाबरून गेल्या. बिबट्याने त्यांच्या हाताला जोरदार चावा घेत मैड यांना जखमी केले. मैड यांच्या ओरडण्यामुळे बिबट्या तेथून पसार झाला.
मैड यांना तातडीने उपचारासाठी साकुर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मैड यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सकाळच्या वेळी बिबट्याने महिलेवर हल्ला केल्याने या परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाला या प्रकाराची माहिती देण्यात आली असून त्यांनी परिसरात तातडीने पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. संगमनेर तालुक्यातील प्रवरा मुळा नदीपट्ट्यालगतच्या भागात बिबट्यांचा वावर वाढला असून वनविभागाने बिबट्यांना पकडत नागरिकांमधील भीती घालविण्याची मागणी होत आहे.

