महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
भारतीय संविधान दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संगमनेर येथे संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संविधानातील समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या मूलभूत मूल्यांचे रक्षण व जतन करण्याचा निर्धार यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
गुरुवारी जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अजिजभाई ओहरा, संगमनेर तालुकाध्यक्ष संपतराव कोळेकर, तालुका महासचिव बाबासाहेब मोकळ आणि तालुका सचिव संदीप भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तालुका सचिव संदीप भोसले यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले, त्यानंतर उपस्थितांनी सामूहिक वाचन करत संविधानाप्रती कृतज्ञता व निष्ठा व्यक्त केली.
जिल्हा उपाध्यक्ष अजिजभाई ओहरा यांनी सांगितले की, देश हा भारतीय संविधानाने दिलेल्या समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या मूल्यांवर चालतो. प्रत्येक नागरिकाला समान अधिकार, सन्मान आणि न्यायाने जगण्याची हमी संविधानाने दिली असून, या मूल्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे.
संगमनेर तालुकाध्यक्ष संपतराव कोळेकर यांनी आपली रोखठोक भूमिका मांडताना स्पष्ट केले की, भारत हा देश भारतीय संविधानावर चालतो, कोणत्याही मनुस्मृतीवर नाही. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच वंचित, शोषित, पीडित, कष्टकरी आणि उपेक्षित समाजाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे. संविधानाचे महत्त्व केवळ एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता त्यातील विचार आणि मूल्ये प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणणे गरजेचे आहे. संविधानविरोधी विचारांना थारा न देता लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक समतेचे जतन करण्यासाठी प्रत्येकाने जागरूक राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.
यावेळी तालुका महासचिव बाबासाहेब मोकळ यांच्यासह उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संविधानाचे संवर्धन, लोकशाही मूल्यांचे रक्षण आणि समाजातील सर्व घटकांना समान न्याय व अधिकार मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धार केला. कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






