महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
संगमनेर नगर परिषदेने तालुकास्तरावर अत्यंत अद्ययावत व सुंदर नाट्यगृह उभारून नाट्य चळवळीला मोठे प्रोत्साहन दिले आहे. आगामी काळात या नव्या अत्याधुनिक कवी अनंत फंदी नाट्यगृहामध्ये नाट्यप्रयोग करण्यास आपले प्राधान्य राहील, असे गौरवोद्गार प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी काढले.
कवी अनंत फंदी व्याख्यानमालेच्या ४९ व्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सुबोध भावे यांची प्रकट मुलाखत पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला संगमनेरमधील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भावे यांनी नगराध्यक्ष व त्यांच्या संपूर्ण टीमचे विशेष कौतुक केले.
बोलताना सुबोध भावे म्हणाले की, मराठी नाटकाला दोनशे वर्षांची समृद्ध परंपरा आहे. अनेक संकटे येऊनही नाट्य चळवळ टिकून राहिली आहे आणि जोपर्यंत मराठी माणूस आहे, तोपर्यंत ती जिवंत राहील. सध्या ‘एआय’चा (AI) जमाना असला तरी नाटकाचा प्रेक्षक वर्ग मोठा आहे, आणि संगमनेरमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांना नेहमीच मोठा प्रतिसाद मिळतो. यापूर्वी येथे खुले नाट्यगृह असताना आपण नाट्यप्रयोग केले आहेत, मात्र आता नगर परिषदेने उभारलेले हे तालुकास्तरावरील अत्यंत सुसज्ज नाट्यगृह अभिमानास्पद आहे. प्रत्येक गावाला व परिसराला स्वतःचा इतिहास असतो आणि तो पुढच्या पिढ्यांसाठी जपणे गरजेचे आहे. संगमनेर शहर व तालुक्याने विकासातून आणि साहित्य, कला व संस्कृतीच्या परंपरेतून राज्यभरात आपली सुसंस्कृत ओळख निर्माण केली आहे, ती जपली पाहिजे, असेही ते म्हणाले.
या नवीन अद्ययावत नाट्यगृहात रसिकांनी मोठी गर्दी केली होती. सुबोध भावे यांनी नाट्यगृहाचा आवर्जून उल्लेख करत येथे भविष्यात नाट्यप्रयोग करण्याची इच्छा व्यक्त करताच उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर नगर परिषदेने उभारलेले हे नाट्यगृह १००० आसन क्षमता आणि सर्व सोयींनी युक्त आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर उभे राहिलेले हे नाट्यगृह सर्वांसाठी आनंददायी ठरले असून, या कामात कोणीही राजकारण न करता सर्वसामान्य नागरिकांचा आनंद महत्त्वाचा मानावा, अशी भावना उपस्थित नागरिक व महिलांनी व्यक्त केली.
अत्यंत दर्जेदार झालेल्या या नाट्यगृहाला पाहण्यासाठी शहर व तालुक्यातील युवक-युवतींसह ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने भेट देत असून, ‘जेन-झी’ पिढीबरोबरच ज्येष्ठ नागरिकही नाट्यगृहाच्या विविध भागांत सेल्फी घेण्याचा आनंद लुटत आहेत.






