महाराष्ट्र संवाद न्यूज-
अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी जलस्रोतांचे बळकटीकरण, प्रलंबित नळ योजनांची जलदगतीने पूर्तता आणि काटेकोर चारा नियोजनावर भर देण्याचे निर्देश पालक सचिव प्रवीण दराडे यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत पालक सचिव प्रवीण दराडे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मनपा आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
दुष्काळ काळात पिण्याच्या पाण्यासाठी केवळ तात्पुरत्या उपायांवर विसंबून न राहता दीर्घकालीन नियोजन करणे गरजेचे आहे. टँकरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी विहिरींसारख्या स्थानिक जलस्रोतांची क्षमता वाढवावी आणि पाणीपुरवठा योजनांमधील तांत्रिक अडचणी तत्काळ दूर कराव्यात, असे दराडे यांनी स्पष्ट केले. पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवण्यासाठी धुळे जिल्ह्यातील शिरपूर पॅटर्नचा अभ्यास करून अंमलबजावणी करावी, तसेच प्रगतीपथावरील नळ योजना निर्धारित वेळेत पूर्ण करून आवश्यकतेनुसार विशेष दुरुस्ती कामे हाती घ्यावीत, अशा सूचनाही त्यांनी संबंधित विभागांना दिल्या.
पशुधनासाठी चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून आगामी हंगामाचे नियोजन आत्तापासूनच करण्याचे आवाहन त्यांनी केले. मका आणि रब्बी ज्वारीचे क्षेत्र वाढवण्यासोबतच सिंचन उपलब्ध असलेल्या भागात चारा लागवडीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांना अधिक चारा बियाणे वाटावे, असे निर्देश कृषी विभागाला देण्यात आले. पारंपरिक उत्पादनासोबतच हायड्रोपोनिक चारा उत्पादन तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखवावीत आणि उपलब्ध चाऱ्याचे सूक्ष्म नियोजन करावे, असेही त्यांनी नमूद केले.
शासकीय योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची प्रलंबित केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी महसूल विभाग, कृषी विभाग आणि निबंधक कार्यालयाने समन्वयाने काम करून येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात, असे आदेश पालक सचिवांनी दिले. बैठकीच्या सुरुवातीला निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी सादरीकरणाद्वारे दुष्काळी परिस्थिती, पाणी व चारा नियोजन तसेच प्रशासनाच्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.






