महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
अहिल्यानगर जिल्ह्याचे पालक सचिव प्रवीण दराडे (IAS) आज, शुक्रवारी (दि. २७ नोव्हेंबर) संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात ते तालुक्यातील पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजशिष्टाचार शाखेकडून प्राप्त झालेल्या अधिकृत दौरा कार्यक्रमानुसार, पालक सचिव प्रवीण दराडे सकाळी पारनेर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांची पाहणी करून हंगा, पारनेर, कान्हूर पठार, टाकळीढोकेश्वर, वासुंदे व मांडवे मार्गे संगमनेर तालुक्यात दाखल होतील. दुपारी १.०० वाजता ते मांडवे, साकूर, जांभुळवाडी, खंडेरायवाडी आणि पिंपळगाव देपा या गावांतील पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार आहेत.
त्यानंतर दुपारी १.३० वाजता संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहावर त्यांचे आगमन होईल आणि तेथे भोजन व राखीव वेळ ठेवण्यात आला आहे. दुपारी २.३० वाजता ते तळेगाव मार्गे साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकाकडे प्रयाण करतील आणि सायंकाळी ५.५० वाजता वंदे भारत एक्सप्रेसने मुंबईकडे रवाना होतील.
पालक सचिवांच्या या दौऱ्यामुळे तालुक्यातील टंचाईग्रस्त भागातील पाणी व चाऱ्याचे प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






