महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
खेळण्यासाठी मोबाईल देतो असे सांगत आठ वर्षाच्या चिमुरडीला स्वतःच्या घरी नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अतिरिक्त व विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने (पोक्सो न्यायालय) दोषी ठरवत वीस वर्ष सश्रम कारावासाची आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
रशीद सरदार बेग (वय २० वर्ष, राहणार खोसपुरी, ता. जि. अहमदनगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून अहमदनगरच्या अतिरिक्त व विशेष (पोक्सो कोर्ट) जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी एच. मोरे यांच्या न्यायालयासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती.
या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, तिसरं इयत्तेमध्ये शिकणारी आठ वर्षे वयाची चिमुरडी २४ नोव्हेंबर २०२० रोजी घरासमोरील ओट्यावर खेळत असताना तेथे आलेल्या आरोपीने चल मोबाईल खेळायला, असे म्हणत तिच्या हाताला धरून त्याच्या घरी नेले. त्यानंतर घराचा दरवाजा बंद करत तिच्या तोंडाला रुमाल बांधला तसेच कानात कापसाचे बोळे घातले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीचा त्याला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला.
त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत घरी आल्यानंतर पीडित चिमुरडीने घडलेल्या प्रकार रडत रडत तिच्या आईला सांगितला. मुलीच्या आईने एमआयडीसी पोलिसांना बोलावत घटनेची माहिती दिली. आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद जाधोर यांनी करत आरोपी विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
न्यायाधीश माधुरी मोरे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती. त्यामध्ये सरकार पक्षातर्फे बारा साक्षीदार तपासण्यात आले. यात अल्पवयीन पीडित चिमूरडीसह पीडितेची आई, साक्षीदार, तपासी अधिकारी, मुख्याध्यापक, महानगरपालिका व वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.
सरकार पक्षाचा व आरोग्याच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश मोरे यांनी आरोपीला दोषी ठरवत भा.दं.वि. कलम ३७६, ३७६(२) (आय) (जे), ३७६ (३) तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा २०१२ चे कलम ६ नुसार दोषी धरून आरोपीस २० वर्षे सक्त मजुरी व २,०००/- रूपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधी कैदेची शिक्षा सुनावली.
सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड. मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले.

