महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे आता शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचिन्ह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
शिवसेनेतील बंडानंतर भारतीय जनता पक्षासोबत गेल्यानंतर मुख्यमंत्री पदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली. त्यामुळे शिंदे यांनी शिवसेना या नावासोबतच धनुष्यबाण या पक्ष चिन्हावर दावा केला होता. यासंबंधीचे निर्णय घेण्याचा अधिकार न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिल्यानंतर निवडणूक आयोगाचा हा मोठा निर्णय समोर आला आहे.
The Election Commission of India today ordered that the party name “Shiv Sena” and the party symbol “Bow and Arrow” will be retained by the Eknath Shinde faction. pic.twitter.com/cyzIZCm8sh
— ANI (@ANI) February 17, 2023
16 आमदारांच्या अपात्रतेबद्दलच्या सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतर निवडणूक आयोग आपला निर्णय जाहीर करेल तसेच या वादात शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह गोठवेल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र सर्वोच्च न्यायालयातील आमदारांच्या अपात्रतेबद्दलच्या निकालापूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाने आपला निर्णय जाहीर केला आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री शिंदे गटाला दिलासा मिळाला असून ठाकरे गटासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

