महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबईचे डॉक्टर संगमनेरमध्ये येत असून मी त्यांच्याकडे जाऊन येतो, असे सांगून गेलेला तरुण बराच वेळ झाला तरी देखील तो घरी न परतल्याने संगमनेर तालुक्यातील झोळे येथील महेश किसन येवले हा २९ वर्षीय तरुण २२ फेब्रुवारीपासून बेपत्ता झाल्याची नोंद संगमनेर शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात कोळवाडे आश्रम शाळेत नोकरी करणारे महेश येवले याचे काका संपत मालुंजकर यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी मिसिंगची नोंद केली आहे. मालुंजकर यांनी म्हटले आहे की, त्यांचे साडू किसन मारुती येवले (रा. झोळे, ता. संगमनेर) यांचा मुलगा महेश येवले हा गेल्या दोन-तीन वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
२२ फेब्रुवारीला सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान महेश हा मालुंजकर यांच्याकडे गणेश विहार मालदाड रोड घुलेवाडी येथे आला होता. मालुंजकर यांच्या घरी दुचाकी उभी करून तो मुंबईचे डॉक्टर संगमनेर येथे येणार असल्याने त्यांच्याकडे जाऊन येतो, असे त्याच्या मावशीस (अनिता मालुंजकर) सांगून गेला. मात्र बराच वेळ झाल्यानंतर देखील तो परत आला नाही. त्यामुळे त्याचा संगमनेर शहरासह नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला मात्र तो आढळून आला नाही.
या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता महेश येवले हरविल्याची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलीस तपास करत आहेत.

