महाराष्ट्र संवाद न्यूज
राज्याचे माजी मंत्री काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आणि संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या आणि शेतकऱ्यांची आर्थिक कामधेनु ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेस राष्ट्रीय स्तरावरील ब्ल्यू रिबन पुरस्काराने महाबळेश्वरमध्ये गौरविण्यात आले आहे.
महाबळेश्वर येथे झालेल्या बँको या संस्थेच्यावतीने पुरस्कार वितरण प्रसंगी बँकोचे राष्ट्रीय अध्यक्ष जोतींद्रभाई मेहता यांचे हस्ते हा पुरस्कार बँकेचे अध्यक्ष सुधाकर जोशी, उपाध्यक्ष ॲड. नानासाहेब शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी यांनी स्वीकारला.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्त व विचारांवर बँकेची वाटचाल सुरू असून बँकेने सातत्याने ऑडिटचा ‘अ’ दर्जा मिळून शेतकरी व सर्वसामान्य मदत केली आहे. अमृतवाहिनी बँकेने नुकताच दुग्धविकास कर्ज योजनेअंतर्गत सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंद पुरवण्याचे काम सुरू केले असून छोटे शेतकरी व व्यावसायिक यांच्यासाठी ही विविध योजना लागू केल्या आहेत.
काळानुरूप केलेले बदल बँकेला लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न यासह या बँकेचे संगणकीय कामकाज, एटीएम, नवीन अद्यावत सुविधांसह असलेली अमृतनगर येथील मुख्य शाखा व संगमनेर मार्केट यार्ड, नेहरू चौक, तळेगाव, घारगाव, साकुर या ठिकाणीही विविध शाखा कार्यरत आहेत. सभासद, शेतकरी व नागरिकांचा मोठा विश्वास या बँकेने संपादन केला असून बँकेच्या चांगल्या कामाबद्दल बँको या संस्थेने सन 2021- 22 चा ब्ल्यू रिबन पुरस्काराने सन्मानित केले आहे.

