महाराष्ट्र संवाद न्यूज ☆ अनंत पांगारकर
“संगमनेर पोलीस काम कमी करण्यासाठी टाळतात एफआयआर; एनसीवर केली जाते बोळवण, नाहीतर न्यायालयात जाण्याचा दिला जातो सल्ला” या आशयाखाली महाराष्ट्र संवाद न्यूजने वृद्ध महिलेवरील अन्यायाबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. संगमनेरचे कार्यक्षम प्रांताधिकारी तथा ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण अध्यक्ष डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी या वृत्ताची गांभीर्याने दखल घेत वृद्ध महिलेला तिच्या घराचा ताबा मिळवून दिला.
संगमनेर शहर पोलीस ठाण्यापासून हाताच्या अंतरावर राहणाऱ्या इंदुबाई रामनाथ पुंड यांना २५ फेब्रुवारीला त्यांच्या सुनेसह तिची बहीण आणि भाऊ यांनी घरामध्ये घुसून मारहाण करीत बळजबरीने त्यांना घराबाहेर हाकलून लावले होते. या संदर्भात पुंड यांनी पोलीस ठाण्यात जात तक्रार देण्याचा प्रयत्न केला मात्र, ठाणे अंमलदारांनी तक्रारी ऐवजी केवळ एनसी नोंदवत वेळ मारून नेली. घराबाहेर काढणाऱ्या लोकांनी मुलीचा आणि नातीचा मोबाईल देखील काढून घेतला होता. त्यामुळे स्वत:च्या मालकीच्या घरातून घराबाहेर काढल्याने संबधीतांवर कारवाई करावी यासाठी ही महिला एकदा नव्हे तर पोलिसांकडे आर्त विनवणी करते. मात्र पोलिसांवर याचा कोणताही परिणाम होत नाही.
नातेवाईकांनी घराबाहेर काढल्यानंतर अन्य नातेवाईकांच्या मदतीने घराबाहेर राहणारी ही वृद्ध महिला सामाजिक भावनेतून काम करणाऱ्या संगमनेरमधील ॲड. सीमा काळे-सातपुते यांची मदत घेते. ॲड. काळे-सातपुते देखील नव्याने पदभार घेतलेल्या पोलीस निरीक्षकांना भेटून वृद्धेचे गाऱ्हाणे मांडतात, नवे निरीक्षक देखील कारवाईचे आश्वासन देतात मात्र, कोणतीही कारवाई होत नाही. या गंभीर विषयाला ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’च्या माध्यमातून प्रसिद्धी दिल्यानंतर या वृत्ताची गांभीर्याने दखल संगमनेरचे ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण अध्यक्ष तथा प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी घेतली.
या वृद्ध महिलेच्या संदर्भात घडलेला घटनाक्रम जाणून घेत न्यायाधिकरणाने माता-पिता व ज्येष्ठ नागरिक निर्वाह अधिनियम २००७ द्वारे याप्रकरणी चौकशी करत या वृद्ध महिलेच्या निवाऱ्याची तरतूद करणे न्यायाधिकरणास बंधनकारक असल्याचे स्पष्ट करत यासंदर्भात तातडीने आदेश पारित केले. या आदेशाच्या आधारे संगमनेरचे नायब तहसीलदार गणेश तळेकर यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये या वृद्ध महिलेला तिच्या घराचा ताबा मिळवून दिला. तसेच या महिलेच्या सुनेला वृद्धेच्या घरामध्ये तिला शांततापूर्ण रहिवासास हरकत अडथळा न करण्याविषयी बजावले. अशी कोणतीही कृती सुनेने न केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
‘महाराष्ट्र संवाद न्यूज’च्या वतीने न्यायाधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे आणि ॲड. सीमा काळे-सातपुते यांचे आभार…
वृद्ध महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी ॲड. सीमा काळे-सातपुते यांनी मोठी मेहनत घेतली. त्यांच्या माध्यमातून हे प्रकरण महाराष्ट्र संवाद न्यूज पर्यंत पोहोचल्यानंतर आम्ही हे वृत्त प्रसिद्ध केले. त्यापाठोपाठ प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल पोलीस यंत्रणे ऐवजी ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण अध्यक्ष तथा प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी घेतली. न्यायाधिकरणाने या महिलेला तिचा स्वतःचा निवारा मिळवून दिला, याबद्दल न्यायाधिकरणाचे आणि ॲड. सीमा काळे-सातपुते आभार व्यक्त करत आहे. महाराष्ट्र संवाद न्यूजच्या माध्यमातून या प्रकरणात आम्हाला खारीचा वाटा उचलता आला.

