महाराष्ट्र संवाद न्यूज
आजचं वास्तव हे दुभंगलेलं नसून भंगलेलं आहे. त्याचे अनेक तुकडे झालेले असून विस्कळीत आणि भंगलेल्या काळाचे तुकडे सांधण्याचा प्रयत्न करणं हे या कादंबरीचं विधान आहे. आपल्या भोवतालच्या वर्तमानाचा अर्थ न लागणं, नीट न समजणं, यातून अतिरेकी संताप होऊन त्या संतापातून वाट काढत आपण स्वतःशी बोलणं. आपल्या मनातील प्रश्नांचे खांब घेऊन त्यावर वास्तू तयार करणे आणि त्या वास्तुत आपल्या प्रश्नांचे उत्तर शोधणे म्हणजे वास्तुशिल्प तयार करणे होय. अशा प्रकारचे वास्तुशिल्प “कोलाज” या कादंबरीतून डॉ. लिंबेकर यांनी तयार केल्याचं मत ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केले.
डॉ. अशोक लिंबेकर लिखित “कोलाज : संभ्रमाचे वर्तमान” या कादंबरीच्या प्रकाशन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून रंगनाथ पठारे बोलत होते. व्यासपीठावर शब्दालयच्या प्रकाशक सुमती लांडे, ज्येष्ठ चित्रकार धनंजय गोवर्धने, संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड आणि लेखक डॉ. अशोक लिंबेकर उपस्थित होते.
पठारे म्हणाले, आपल्या सभोवतालच्या वर्तमानाला समजावून घेऊन त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न या कादंबरीतून झाला आहे. प्रेमभावना ही चिरंतन भावना आहे. आजच्या काळात प्रेम हे विकृतीकडे वळत असताना कादंबरीतील प्रेमाचे सुंदर चित्रण त्यासोबत अनेक प्रकारची शब्दशिल्प तयार करणं हे खूप आश्वासक आणि सुंदर आहे. आजचं वर्तमान उद्या बदलतं. नित्य असं हातात धरून ठेवावं असं नाही. हा सगळा संभ्रमित करणारा काळ आणि बदल त्याचे अनेक रूप चित्रित करणे हा लेखकाचा धर्म लिंबेकरांनी या कादंबरीतून पाळला आहे.
प्रास्ताविकात सुमती लांडे यांनी आपल्या प्रकाशन संस्थेमार्फत अनेक पुस्तकांची निर्मिती करत समाजामध्ये वाचन संस्कृती टिकून राहण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत असे सांगितले.
या कादंबरीच्या मुखपृष्ठाविषयी ज्येष्ठ चित्रकार धनंजय गोवर्धने म्हणाले की, चित्रकाराचं व्यक्त होणं म्हणजे कादंबरीचा आशय लक्षात घेऊन त्याचा अर्थ चित्र स्वरूपात साकार करणं होय.
याप्रसंगी कादंबरीवर आधारित संवादसत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये डॉ. राजेंद्र सलालकर, डॉ. आनंद कुलकर्णी, प्रा. सुशील धसकटे व डॉ. दत्तात्रय गंधारे या समीक्षकांनी कोलाज या कादंबरीतील विविध पैलूंवर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे आभार डॉ. राहुल लांडे यांनी मांनले तर सूत्रसंचालन डॉ. जितेंद्र पाटील यांनी केले. प्रकाशन कार्यक्रमासाठी संगमनेरातील अनेक रसिक वाचक उपस्थित होते.

