संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
सहकारी महिलेचे आक्षेपार्ह फोटो कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या व्हाट्सअप ग्रुप वर टाकणाऱ्या त्या कृषी पर्यवेक्षकाचे विभागीय कृषी सहसंचालकांनी तात्काळ निलंबन केले आहे. पर्यवेक्षकाच्या निलंबनाच्या आदेश संगमनेर कृषी विभागाला प्राप्त झाल्याची माहिती मिळाली.
संगमनेरच्या कृषी विभागाला पुरते बदनाम केलेल्या आणि त्याला अनेकदा पाठीशी घातलेल्या या रंगेल कर्मचाऱ्याच्या गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चानंतर कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी त्याच्यावर कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागले होते. व्हाट्सअप ग्रुपवर फोटो टाकले गेल्यानंतर जागा झालेल्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने यासंदर्भात वरिष्ठांना माहिती दिली होती.
त्यानंतर कृषी विभागाच्या विभागीय कृषी सहसंचालक र. शा. नाईकवाडी यांनी संगमनेर कृषी विभागातील कृषी पर्यवेक्षक असलेल्या सुरेश कांतीलाल घोलप याचे तात्काळ निलंबन केले असून त्यांचे मुख्यालय उपविभागीय कृषी अधिकारी राजगुरुनगर येथे ठेवण्यात आले आहे. कृषी सहसंचालकांनी तात्काळ दाखल घेत या कर्मचाऱ्यांचे निलंबन केल्याने कृषी विभागातून समाधान व्यक्त होत आहे.

