नाशिक (महाराष्ट्र संवाद न्यूज)
नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. संजीव सोनवणे यांची राज्यपाल रमेश बैस यांनी नियुक्ती केली आहे. सोनवणे यांच्याकडे पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा प्र कुलगुरूपदाचा पदभार होता.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई वायुनंदन यांचा कार्यकाळ मार्च २०२२ मध्ये संपला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू असलेले डॉ. सोनवणे हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे नववे कुलगुरू आहेत. कुलगुरूपदासाठी राज्यभरातील इच्छुकांच्या मुलाखतींची प्रक्रिया पार पडल्यानंतर राज्यपाल कार्यालयाकडून डॉ. सोनवणे यांची कुलगुरूपदी निवड करण्यात आली.
डॉ. सोनवणे यांनी आतापर्यंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख, मुक्त अध्ययन प्रशाळेचे प्रमुख आदी जबाबदार्या पार पाडल्या आहेत. पुणे विद्यापीठात सध्या ते प्रभारी कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. वयाची ६५ वर्षे किंवा पाच वर्षे यातील जे आधी होईल त्या कालावधीसाठी डॉ. सोनवणे यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड करण्यात आली.
कुलगुरूपदी झालेल्या निवडीबाबत आनंद व्यक्त करून डॉ. सोनवणे म्हणाले, की तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोहोचवण्याची संधी प्राप्त झाली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करणे, अभ्यासक्रम रोजगारक्षम करणे अशा काही उद्दिष्ट्यांवर काम करण्यास प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

