महाराष्ट्र संवाद न्यूज
नाशिक : गेल्या महिनाभरापासून रखडलेल्या बदल्यांना अखेर मुर्हूत लागला आहे. राज्य सरकारने नाशिक विभागातील बदल्यांचे आदेश जारी केले असून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या संगमनेरचे तत्कालीन प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांची नाशिक जिल्हा निवडणुक उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर या पदावर कार्यरत असलेल्या स्वाती थविल यांची उपजिल्हाधिकारी पाटबंधारे क्रमांक १ येथे बदली करण्यात आली आहे. 
संगमनेरचे तत्कालीन प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांची महिनाभरापूर्वी नाशिक येथे बदली करण्यात आली होती मात्र त्यांना नियुक्तीचे ठिकाण देण्यात आले नव्हते. मंगरूळे यांनी संगमनेरमध्ये २०१९ ते २०२३ या कार्यकाळात संगमनेर उपविभागीय अधिकारी म्हणून काम पाहिले. संगमनेरला येण्यापूर्वी त्यांनी २०१६ ते २०१९ यादरम्यान नासिक येथे उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले होते.
संगमनेर येथे कार्यरत असतांना त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले होते. या काळात कोरोनाचे संकट गहिरे होत असतानाच स्वत:च्या आईच्या मृत्यूनंतर लगेचच अवघ्या दीड दिवसात ते कर्तव्यावर हजर झाले. त्यांच्या याच कार्यतत्परतेची दखल खुद्द माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतली होती.
त्याचप्रमाणे गेल्या सात वर्षांपासून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळात कार्यरत असलेले विठठल सोनवणे यांची सहायक आयुक्त (भूसुधार) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे प्रशासक म्हणून कार्यरत असलेले विठठल सोनवणे यांनी तब्बल सात वर्ष या विभागाचे काम पाहिले. समृध्दी महामार्गाच्या भूसंपादनापासून ते उदघाटनापर्यंतच्या प्रवासात त्यांनी मोलाचे योगदान दिले.
या अधिकार्यांच्या झाल्या बदल्या …
कुंदनकुमार सोनवणे : सहायक आयुक्त (मावक) नाशिक
स्वाती थविल : उपजिल्हाधिकारी पाटबंधारे क्रं.१
नितीन सदगी : उपविभागीय अधिकारी मालेगाव
संजय बागडे : सचिव गानिप्र, ससप्र, नंदुरबार
नितीन गावंडे : निवासी उपजिल्हाधिकारी धुळे
अर्चना जाधव-तांबे : उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र.१३ पुणे
संदिप चव्हाण : उपजिल्हाधिकारी संगायो, मुंबई उपनगर
डॉ. विक्रम बांदल : उप विभागीय अधिकारी विटा, जि. सांगली

