महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – जगात अनेक नावाजलेली व दैदिप्यमान यश मिळवलेली माणसे आहेत. त्यांचे यश आपल्याला दिसते मात्र त्यामागील त्यांचे प्रयत्न दिसत नाही. अशाच यशस्वी व्यक्तींपैकी एक म्हणजे क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर. प्रत्येकाला सचिन व्हावेसे वाटते पण सचिनसारखे कष्ट नको असतात. असे चालणार नाही. तुम्हाला जर यशाच्या शिखरावर जायचे असेल व इच्छित ध्येय गाठायचे असेल तर योग्य दिशेने प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन संगमनेर विभागाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले.
विद्या विद्यापीठ संचलित व्हिजन कोचिंग इन्स्टीट्युटच्यावतीने आयोजित केलेल्या दहावीच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विदयापीठाचे अध्यक्ष डॉ. नामदेव गुंजाळ होते. प्रा. राहुल मिश्रा, प्रा. सुनिल सुतार, डॉ. हर्षवर्धन गुंजाळ आदी यावेळी उपस्थित होते.
वाघचौरे म्हणाले, अभ्यास व करिअरच्या वाटा हा माझा जिव्हाळ्यााचा विषय राहिला आहे. मला मार्गदर्शन मिळण्यासाठी खूप आटापिटा करावा लागला. तुम्ही सर्व भाग्यवान आहात की, तुम्हाला व्हिजन कोचिंग इन्स्टीट्युट तुमच्या गावातच आहे. व खास अनुभवी व तज्ञ शिक्षक तुमच्या अध्यापणासाठी आहेत. या संधीचा फायदा संगमनेर, अकोले तालुक्यातील विद्यार्थ्यासह पालकांनी घेतला पाहिजे.
डॉ. नामदेव गुंजाळ म्हणाले, आम्ही ग्रामीण भागातून आलो असल्याने ग्रामीण भागातील मुलांच्या समस्या आम्हाला चांगल्या माहिती आहेत. घरातील एकाने जरी उच्च शिक्षण घेतले तरी घरची परिस्थिती बदलून जाते. एवढेच नाही तर कुटूंबातील पुढील पिढ्यांना योग्य दिशा मिळते. याचा विचार करुन आता पालकांनी जागरूक होवून आपल्या पाल्यांना इंजिनीअर, डॉक्टर व प्रशासकीय सेवेत पाठविले पाहिजे.
प्रा. राहूल मिश्रा यांनीदेखील यावेळी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संचालक डॉ. हर्षवर्धन गुंजाळ यांनी केले तर आभार व सुत्रसंचलन व्यवस्थापक दीपक पावसे यांनी केले.

