महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर: शहरातील नासिक-पुणे महामार्गावर असलेल्या जोर्वे नाका येथे रविवारी (ता २८मे) रात्री झालेल्या हाणामारी आणि दंगल प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या वीस आरोपींना सोमवारी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
जवळपास तीन आठवडे आरोपी तुरुंगामध्ये होते. शहरातील जोर्वे नाका येथे झालेल्या वादातून काही नागरिकांवर धारदार शस्त्राचा वापर करत प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाला. यात जोर्वे येथील आठ जणांना बेदम मारहाण करत जखमी करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तातडीने आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
या घटनेचे पडसाद तालुक्यात व शहरात देखील उमटले. घटनेच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये भव्य भगवा मोर्चा देखील काढण्यात आला होता. त्यामुळे शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रकाराची राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय पातळीवरून देखील गंभीर दखल घेण्यात आली.
त्यामुळे संगमनेरमध्ये नासिक परिक्षेत्राचे आयजी बी. जी. शेखर, अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संगमनेरमध्ये ठाण मांडले होते. राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक शहरात पाचारण करण्यात आले. दोन दिवसात पोलिसांनी या घटनेतील वीस आरोपी निष्पन्न करत त्यांना अटक केली होती. त्या वेळेपासून आतापर्यंत आरोपी अटकेत होते. अटकेतील आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कलम 307, 326, 143, 147, 149, 34 आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शेहबाज याकूब शेख, नफीस अनिस पठाण, इस्माईल निसार पठाण, अबुजर बिलाल शेख, अलताफ मुस्तफा अन्सारी, सलमान साजिद शेख, अमजद गुलामनबी शेख, शकील नासीर पठाण, अहद अन्सार सय्यद, नईम कादर शेख, रेहान गुलफान पठाण, अमीर रफिक शेख, तौफिक शफिक शेख, शेहनाज गफार शेख, अरबाज करीम शेख, कासिफ असद कुरेशी, हुजेब शब्बीर शेख, फैसल महमद शेख, मोबीन मुबारक शेख व इम्रान उस्मान पठाण यांचा आरोपींमध्ये समावेश होता.
आरोपींच्यावतीने न्यायालयात ॲड. शरीफ पठाण, ॲड. सैफुद्दीन शेख, ॲड. मोहसीन खान, ॲड. तन्वीर शेख यांनी काम बघितले. सोमवारी या सर्वांच्या जामीन अर्जावर संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांनी निर्णय देत सर्वांना जामीन मंजूर केला.

