महाराष्ट्र संवाद न्यूज
पुणे – सेतूचे दाखले देण्याचा सर्व्हरमध्ये अडथळे असल्याने ईडब्लूएस विद्यार्थ्याकडून अर्जाची पोहोच पावती व हमीपत्र भरुन घेऊन प्रवेश देण्यात यावा. तसेच विद्यार्थ्यांना उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ३ महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी केली आहे.
कोंढरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने शैक्षणिक प्रवेशाच्या दाखल्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन काही दिवस फिफो यंत्रणा बंद ठेवून विद्यार्थ्यांचे अर्ज प्राधान्य क्रमाने निकाली काढावेत यासाठी निर्देश दिले होते. त्यामुळे प्रश्न सुटला असे वाटत असताना आता सर्व्हर बंद पडल्याने दाखले देण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने त्यांच्याकडील पत्र क्रमांक प्रवेश-०४२२/प्र.क्र. ४१ / एसडी – २ दिनांक २२ जून २०२३ च्या पत्राने शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांना इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करु न शकल्यास, विद्यार्थ्याकडून अर्जाची पोहोच पावती व हमीपत्र भरुन घेऊन प्रवेश देण्यात यावा.
तसेच विद्यार्थ्यांना उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ३ महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्याच धर्तीवर ई डब्लू एस विद्यार्थ्याकडून अर्जाची पोहोच पावती व हमीपत्र भरुन घेऊन प्रवेश देण्यात यावा.
या विद्यार्थ्यांना उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सचिव शालेय शिक्षण विभाग, सचिव उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांना निवेदन दिले आहे.

