अहिल्यानगर:
श्रीरामपूर येथील सराईत गुन्हेगाराशी कथित संबंध असल्याच्या कारणावरून पोलीस अंमलदार शंकर चौधरी यांना अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. या धडक कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
पोलीस अंमलदार शंकर चौधरी हे यापूर्वी श्रीरामपूर येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत होते. मात्र, त्यांच्यावर गुटखा तस्करीशी संबंधित कथित आरोप झाल्यानंतर त्यांची बदली पोलीस मुख्यालयात करण्यात आली होती.
त्यानंतर नुकतेच त्यांचे सराईत गुन्हेगारांसोबतचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते. तसेच वाळू तस्करी व इतर गंभीर गुन्ह्यांतील संशयितांशी त्यांचे जवळचे संबंध असल्याचा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी केला होता.
दरम्यान, श्रीरामपूरमधील हॉटेल व्यावसायिक आकाश दुबय्या यांच्या भीषण हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरात तीव्र संतापाचे वातावरण असून नागरिकांनी कडकडीत बंदही पाळला होता. या सर्व प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
हाच वाढता जनआक्रोश लक्षात घेऊन आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी ही कडक कारवाई केली आहे. गुन्हेगारीशी आणि गुन्हेगारांशी कोणताही संबंध खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट आणि कडक संकेत या निलंबनाच्या कारवाईतून पोलीस प्रशासनाने दिला आहे.