अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पोलिसांनी २५ लाख रुपये किमतीचा पांढऱ्या-निळ्या रंगाचा हायवा आणि ६० हजार रुपये किमतीची ६ ब्रास वाळू असा एकूण २५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला
जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली आहे. वैजापूरकडून पुणतांबा फाटा रोडने बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या एका हायवा ट्रकवर छापा टाकून पोलिसांनी २५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश लोंढे, निळकंठ कारखेले, रणजीत जाधव, सतीष भवर आणि बाळासाहेब गुंजाळ यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुणतांबा फाटा येथे सापळा रचून पोलिसांनी संशयित टाटा कंपनीचा हायवा (क्र. MH-43-Y-0520) थांबवला. वाहनाची पाहणी केली असता त्यात अवैध वाळू आढळून आली.
या कारवाईत पोलिसांनी चालक भाऊसाहेब देविदास मोरे (वय ४०, रा. खटकळी, ता. कोपरगाव) यास ताब्यात घेतले. वाळू वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारपूस केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी २५ लाख रुपये किमतीचा पांढऱ्या-निळ्या रंगाचा हायवा आणि ६० हजार रुपये किमतीची ६ ब्रास वाळू असा एकूण २५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहेत.