अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या विरोधात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानंतर कारवाईचे अस्त्र उगारले आहे. कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी सुमारे २० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश लोंढे, निळकंठ कारखेले, रणजीत जाधव, बाळासाहेब गुंजाळ आणि सतीष भवर यांच्या विशेष पथकाने ही कामगिरी बजावली. गुरुवारी (३ सप्टेंबर) गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून हे छापे मारले.
या कारवाईदरम्यान कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पहिल्या कारवाईत १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यात साहिल शेख, सोमनाथ चौभे, शुभम मंडलीक आणि संकेत गावंड या चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे. हे चौघेही सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
दुसऱ्या कारवाईत ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी कारवाडी येथील ६७ वर्षीय दगू किसन हुमरे याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. अहिल्यानगर पोलीस प्रशासनाने अवैध वाळू तस्करांविरोधात छेडलेल्या या आक्रमक मोहिमेमुळे जिल्ह्यातील बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.