संगमनेर शहराजवळील कोल्हार-घोटी रस्त्यावरील समनापूर फ्लॉवर मार्केट चौफुली येथील राजहंस मिल्क पार्लरचे शटर वाकवून रोकड लंपास करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना शहर पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद केले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
२ सप्टेंबर रोजी पहाटे तीन ते सव्वा तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी समनापूर चौफुलीवरील राजहंस मिल्क पार्लर-साई अमृत मठ्ठा हे बंद दुकान लक्ष्य केले. दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश करत चोरट्यांनी गल्ल्यातील ४३ हजार ८०० रुपयांची रोकड लांबवली. याप्रकरणी दुकानमालक सुधीर उत्तम राहींज यांच्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३) आणि ३०५ अन्वये गुन्हा क्रमांक ८३४/२०२६ दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून प्रेम विजय वाल्हेकर (वय २४, रा. आठरापगड, वेल्हाळे रोड, संगमनेर) आणि उमेश गुलाब जारे (वय २०, रा. म्हसोबानगर, थोरात कारखान्यामागील माळरान, संगमनेर) या दोघांना २ सप्टेंबर रोजी रात्री १०.०३ वाजता ताब्यात घेऊन अटक केली.
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल आणि चोरीसाठी लागणारे २,४५० रुपये किमतीचे साहित्य जप्त केले आहे. यामध्ये लोखंडी पहार, कटर, स्क्रू ड्रायव्हर, पक्कड आणि विविध आकारांचे पाने या हत्यारांचा समावेश आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी प्रेम वाल्हेकर हा पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अशाच स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. प्राथमिक चौकशीत आरोपींनी इतरही काही गुन्ह्यांची कबुली दिली असून लवकरच अनेक चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत सावंत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.