महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरातील बहुचर्चित खून प्रकरणात मुख्य आरोपी प्रकाश जाधव याची १० महिन्यानंतर जामिनावर सुटका करण्यात आली असून, अद्याप डीएनए अहवाल न मिळाल्याचा युक्तिवाद बचावासाठी न्यायालयात महत्त्वपूर्ण ठरला.
घटनेची पार्श्वभूमी अशी, डिसेंबर २०२५ मध्ये संगमनेर तालुक्यातील घारगाव जवळील आंबी खालसा परिसरात मुळा नदीच्या काठावर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. शवविच्छेदन अहवालात संबंधित व्यक्तीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७०/२०२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक कौशल्य आणि वेगाने तपास करत या प्रकरणी डिसेंबर २०२५ मध्ये तीन संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. तपास पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी २०२६ मध्ये पोलिसांनी या प्रकरणात संगमनेरच्या न्यायालयात आरोपीं विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या गुन्ह्यात अडकलेले आरोपी प्रकाश जाधव हे गेल्या १० महिन्यांहून अधिक काळापासून कारागृहात होते. यादरम्यान त्यांनी ॲड. शोण दिपक थोरात यांच्या मार्फत संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावरील सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने खटल्यातील तांत्रिक बाबी आणि त्रुटींवर बोट ठेवले. तपासादरम्यान पोलिसांकडे महत्त्वाचा मानला जाणारा डीएनए अहवाल अद्याप अप्राप्त असल्याचा मुद्दा ॲड. थोरात यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. तसेच आरोपीला गुन्ह्याशी थेट जोडणाऱ्या भक्कम पुराव्यांच्या अभावावरही युक्तिवादात भर देण्यात आला.
बचाव पक्षाचा हा युक्तिवाद आणि कागदपत्रांमधील बाबी ग्राह्य धरत जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांनी गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी आरोपी प्रकाश जाधव याचा जामीन अर्ज मंजूर केला. या कायदेशीर लढ्यात ॲड. शोण थोरात यांना ॲड. प्रमोद शिंदे आणि ॲड. आकाश जाधव यांचे सहकार्य लाभले. खूनासारख्या गंभीर गुन्ह्यातही प्रत्येक आरोपीची भूमिका, तपासातील त्रुटी आणि उपलब्ध पुराव्यांचा कायदेशीर अभ्यास करून न्यायालय योग्य तो निर्णय देते, हे या प्रकरणाच्या निकालावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.