महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई महापालिकेने आपला राजीनामा स्वीकारावा, यासाठी न्यायालयात गेलेल्या शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवार असलेल्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत राजीनामा स्वीकारण्याच्या दिलेल्या आदेशामुळे लटके यांचा चेंबूर पोट निवडणुकीतील उमेदवारी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर होऊ घातलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दिवंगत लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. मात्र त्यांनी दिलेला नोकरीचा राजीनामा मुंबई महापालिकेकडून स्वीकारण्यात न आल्याने लटके यांनी या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर गुरुवारी न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयासमोर दोन्ही बाजू कडून जोरदार व्यक्तिवाद करण्यात आला.
न्यायालयाने मुंबई महापालिकेला राजीनामा मंजूर करण्याबाबत नेमकी काय अडचण आहे याची विचारणा केली असता महापालिकेच्या वकिलांनी सांगितले की लटके यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप आहे. राजीनामेसाठी एक महिन्याचा कालावधी आवश्यक असून त्यांच्या उमेदवारीला महापालिकेचा विरोध नाही त्या अर्ज दाखल करू शकतात. लटके यांच्या विरोधात 12 ऑक्टोंबर ला भ्रष्टाचाराची तक्रार दाखल झाली आहे. यावर लटके यांच्या वकिलाने युक्तिवाद केला की, लटके यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी होत राहील तसेच जोपर्यंत राजीनामा मंजूर होत नाहीत, तोपर्यंत उमेदवारी अर्ज वैध ठरविला जात नाही.
पैसे भरले म्हणून नोटीस कालावधी कमी करण्याची मागणी करता येणार नाही असे सांगत न्यायालयाने महापालिकेला शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत राजीनामा मंजूर करून पत्र देण्याबाबत सूचित केले आहे.
महाराष्ट्र संवाद मधील बातम्या जाहिरातींसाठी संपर्क साधा
अनंत पांगारकर 75 88 600 950

