महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खासदार संजय राऊत यांना अखेरीस आज विशेष पीएमएल न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले असून टायगर परत आलाय अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
खासदार संजय राऊत यांच्यासह प्रवीण राऊत यांनाही मंजूर करण्यात आला आहे. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर विशेष पीएमएल न्यायालयात सुनावणीचे काम पूर्ण झाले होते. न्यायालयाच्या दिवाळी सुट्टी अगोदर झालेल्या सुनावणी दरम्यान अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तिवाद करत लेखी म्हणणे देण्यासाठी वेळ मागितला होता.
मात्र जामीना संबंधीच्या याचिकेवरील आदेश 9 नोव्हेंबर पर्यंत न्यायालयाने राखून ठेवला होता. त्यानुसार विशेष सत्र न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यापुढे ईडीच्या वतीने ॲड. आशीष चव्हाण यांनी लेखी म्हणणे सादर केले, तर संजय राऊत यांच्या वतीने ॲड. विक्रांत साबणे यांनी बाजू मांडली.
न्यायालयाने संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांची जामिनावर मुक्तता केल्यानंतर शिवसेनेतून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून शिवसैनिकांनी ‘तोफ पुन्हा धडधडणार, टायगर परत आलाय’ अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
या निर्णयावर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी म्हटले आहे की, संजय राऊत हे खरे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत.

